नवी मुंबई पालिकेतील पाच टक्क्यांचा भ्रष्टाचार, कळवा बेलापूर बँकेतील सर्वसामान्यांच्या ठेवी, घराणेशाही, पालिकेच्या कामांचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न, गुन्हेगारीमुक्त ऐरोली, एफएसआयच्या नावाने शहरी नागरिकांची फसवणूक, प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करताना घातलेला खो यांसारख्या विषयांवर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात रान उठविणार असल्याचे काँग्रेसचे नवी मुंबईतील दोन उमेदवार नामदेव भगत व रमाकांत म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
नवी मुंबईत काँग्रेस व राष्ट्रवादीचे हाडवैर जुने आहे. त्यामुळे राज्यात आज आघाडीत बिघाडी व युतीची माती झाली असली तरी नवी मुंबईत हा सिलसिला गेली वीस वर्षे सुरू आहे. आमदारकीच्या दोन जागांपैकी एक जागा देण्याची काँग्रेसची मागणी होती. आघाडी तुटल्याने दोन जागांवर उमेदवार उभे करण्याची संधी काँग्रेसला मिळाली असून बेलापूरमध्ये नामदेव भगत व ऐरोलीत रमाकांत म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन नाईकांना लक्ष्य केले. त्यासाठी मागील निवडणुकीत नाईकांच्या जाहीरनाम्याचे वितरण करण्यात आले. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत नाईकांचा प्रचार झाला. या परिषदेला अखिल भारतीय काँग्रेसचे अनिल कौशिक, अध्यक्ष दशरथ भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, दोन उमेदवार महिला अध्यक्षा नीला लिमये उपस्थित होते. निवडणुकीतील प्रचाराची रणनीती स्पष्ट करताना या उमेदवारांना पालिकेच्या कामांचे श्रेय घेतले जात असून नाईकांनी आमदार, मंत्री म्हणून एकही नवी मुंबईत काम केले नसल्याचे स्पष्ट केले. मंत्री अनधिकृत बांधकाम (रेती बंदरवरील ग्लास हाऊस) करीत असेल, तर जनतेने कोणाकडे पाहावे, असा सवाल कौशिक यांनी केला. त्यामुळे यापुढे नाईकांवर आरोपांच्या फैरी झडणार असल्याचे स्पष्ट झाले.