महावितरणने शेतीपंप, तसेच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्याचे प्रकार तत्काळ न थांबवल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी बिपीन शर्मा यांना या बाबत निवेदन देण्यात आले.
महावितरणकडून शेतकऱ्यांचे शेतीपंप व ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनांची वीज तोडली जात आहे. लातूर, रेणापूर व औसा तालुक्यांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला. रब्बी हंगामात तरी काही पदरात पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. काही शेतकऱ्यांकडे उसाचे पीक आहे. रब्बी हंगामाला पाण्याची गरज आहे. अशा स्थितीत शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. ग्रामपंचायतीकडे थकबाकी पूर्णपणे भरण्याइतकी रक्कम उपलब्ध नाही. वीज खंडित केल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. महावितरणने ग्रामपंचायतींना हप्ते पाडून पसे भरण्याची सवलत दिली पाहिजे.
महावितरणने आपला हेका चालूच ठेवल्यास काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाभर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात आमदार वैजनाथ िशदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर, जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, धनंजय देशमुख, यशवंत पाटील, पं.स. सभापती मंगलप्रभा घाडगे, रेणापूरच्या सभापती अनिता पवार, कल्याण पाटील, शिवाजी पाटील कव्हेकर आदींचा समावेश होता.