गंगाखेड नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. बेधुंद कारभारामुळे पालिकेत ठेकेदारांचे राज्य आहे. केवळ ठेकेदारी घेण्याचा सपाटा सुरू असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केला.
गंगाखेड नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या एक वर्षांच्या कारकीर्दीचा पंचनामा डॉ. केंद्रे यांनी केला.
दिलकश चौकात एका सभेत सत्ताधाऱ्यांवर ठेकेदारीचे आरोप केले. ते म्हणाले, सत्ताधारी २१ डिसेंबरला खुर्चीत बसले. राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गंगाखेड पॅटर्न पुढे आला. या वर्षांत त्यांनी आश्वासने तर पूर्ण केलीच नाहीत. शहराची पुरती वाट लावली. बनावट बिलांचा सपाटा सुरू असून जनतेच्या पैशातून बगलबच्च्यांना ठेकेदारी मिळवून देण्यापलीकडे आमदारांनी काय केले, असा सवालही केला. शहरात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असून १० दिवस पाणीपुरवठा केला जात नाही. शहरात अस्वच्छता आहे. केवळ विरोध म्हणून एकत्र आलेली मंडळी काहीच करत नाहीत. विरोधी पक्षाने प्रश्न हाती घेतला, की विरोधक राजकारण करीत आहे असे म्हणत चुकीच्या चर्चा पसरविल्या जातात, असेही केंद्रे म्हणाले.
गंगाखेड पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. तरीही गेल्या वर्षभरात ते निधी आणू शकले नाहीत. तांत्रिक चुकीचा गैरफायदा घेत सव्‍‌र्हे क्र. २४८ मधील गाडय़ांच्या लिलाव प्रकरणात सत्ताधारी व्यापाऱ्यांना वेठीस धरीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या सभेस माजी खासदार सुरेश जाधव, माजी सभापती शिवाजी निर्दुडे, लक्ष्मण मुंडे, प्रमोद साळवे, आदी उपस्थित होते.