स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचे अभियान अनेक प्रकारे, अनेक वष्रे चालवूनही आपले शहर स्वच्छ करण्यात फारसे यश हाती लागलेले नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे नागरिकांचा या अभियानात थेट सहभाग नव्हता. त्यामुळेच नागरिकांना सहभागी करून घेत स्वच्छता अभियान राबवण्यासाठी महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यानुसार दर शनिवारी मुंबईच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी या अभियानात भाग घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे..पंतप्रधानांच्या पुढाकाराने देशभरात महात्मा गांधी जयंतीपासून सुरू झालेल्या स्चच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार स्वच्छ भारत- स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत प्रत्येक प्रभागात दर शनिवारी एका परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. याचाच अर्थ एकाच वेळी शहरातील २२७ परिसरात स्वच्छता केली जाईल. पंतप्रधानांच्या योजनेनुसार प्रत्येक नागरिकाने आठवडय़ातील दोन तास व वर्षांतील १०० तास स्वच्छतेसाठी श्रमदान करायला हवे. दर शनिवारी स्वच्छता होत असलेल्या परिसराची माहिती महानगरपालिकेच्या http://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर दिली जाणार आहे. त्यानुसार नागरिकांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी केले आहे.पालिकेने स्वतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही या योजनेत सहभागी करून घेतले असून दर शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत पालिका अधिकारी व कर्मचारी स्वत:चे कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी हाती झाडू घेणार आहेत.