संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे अग्निकुंड आपल्या बुलंद आवाजाने आणि लेखणीने धगधगत ठेवणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा वरळी येथील पुतळा आणि लगतच्या बगीचाच्या देखभालीसाठी नळजोडणी देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. पुतळ्याभोवतीची वृक्षसंपदा पाण्याअभावी कोमेजून गेली असून पुतळ्याच्या सफाईकरीता लागणाऱ्या पाण्यासाठी जवळच्याच पेट्रोलपंप मालकाकडे हात पसरावे लागत आहेत. महापालिकेची अनास्थाच या सर्व प्रकारास कारणीभूत ठरली आहे.
प्रसिद्ध लेखक, नाटककार, ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी राजकारणी आणि वक्ते, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज बुलंद करणारे नेतृत्व असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य अत्रे यांच्या पूर्णकृती पुतळा मुंबईमध्ये असावा यासाठी ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे यांनी पुढाकार घेऊन आचार्य अत्रे स्मारक समितीची स्थापना केली. वरळी नाक्यावरील आचार्य अत्रे यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी नऊ फूट उंच पूर्णाकृती धातूचा पुतळा बसविण्याचे निश्चित झाले. आचार्य अत्रे यांच्या ११२ व्या जयंती दिनी, १३ ऑगस्ट २००९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. पूर्वी तेथे बसविलेला आचार्य अत्रे यांच्या अर्धपुतळा सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनाकडे सुपूर्द करण्यात आला. आचार्य अत्रे यांची जयंती आणि पुण्यतिथी दिनी वरळी येथे दरवर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येत होते. सुरुवातीला या पुतळ्याच्या चहुबाजूने शोभेची वृक्षसंपदा बहरली होती. मात्र पाणीपुरवठय़ाची काहीच व्यवस्था नसल्यामुळे अल्पावधीतच ही वृक्षसंपदा कोमेजली. काही हितचिंतकांनी जवळच्याच पेट्रोल पंप मालकाला विनंती करून तेथून पाण्याची व्यवस्था केली. परंतु मिळणारे पाणी अपुरे असल्याने वृक्षसंपदा लोप पावत गेली. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या आसपास आपल्या पक्षाच्या नेत्यांचे मोठमोठे फलक झळकवून या परिसराचे पूर्णपणे विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली. परंतु पालिका त्याकडेही कानाडोळा करीत आहे.
दोन वर्षांपूर्वी आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यास आलेल्या समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी महापौर श्रद्धा जाधव उपस्थित होत्या. पुतळ्याची स्वच्छता आणि वृक्षसंपदेसाठी लागणाऱ्या पाण्याकरीता नळजोडणी द्यावी, अशी विनंती कार्यकर्त्यांनी समारंभ सुरू होण्यापूर्वी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी आपल्या भाषणात श्रद्धा जाधव यांनी येथे तातडीने नळजोडणी देण्याचे आश्वासन दिले. मात्र माजी महापौरांचे आश्वासन हवेतच विरले असून आजतागायत तेथे नळजोडणी मिळू शकलेली नाही.  दरम्यानच्या काळात काकासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आणि समितीचे कामही थंडावले. या पुतळ्याची देखभालही वाऱ्यावरच होती. अखेर सहा महिन्यांपूर्वी देखभालीसाठी हा पुतळा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला. महापालिकेनेही तत्परता दाखवून तेथे सुरक्षा रक्षक तैनात केला. तसेच वृक्षसंपदेची मशागत करण्यात आली. परंतु नळजोडणी मात्र आजही मिळू शकलेली नाही. त्यामुळे पाणी मिळालेच तर पुतळ्याची सफाई आणि वृक्षसंपदेची मशागत होऊ शकेल. अन्यथा दुर्लक्षित स्मारकांमध्ये आणखी एकाची भर पडण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.