महापालिकेची स्थापना झाल्यापासून नाशिक नगरीचा किती अन् कसा विकास झाला याचे अनेक दाखले दिले जात असले तरी याच काळात शिक्षण क्षेत्राची मात्र अव्याहतपणे अधोगती सुरू असल्याची बाब बी. डी. हायस्कूल बचाओ कृती समितीने केलेल्या सर्वेक्षणात ठळकपणे पुढे आली आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील एक शाळा वर्षांगणिक बंद पडत असून आजवर बंद पडलेल्या शाळांचा आकडा एकतीसवर पोहोचला आहे. गंभीर बाब म्हणजे, पटसंख्येअभावी आणखी काही शाळांचे मार्गक्रमण त्या दिशेने होत आहे. पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांची उदासिनता, गुणवत्तेचा अभाव यामुळे गोरगरिबांचे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ हिरावले जात असल्याने शैक्षणिक प्रगती खुंटलीच, शिवाय सामाजिक विषमता निर्माण होण्याचा धोका निर्माण झाल्याचे हे सर्वेक्षण दर्शवत आहे.
बी. डी. भालेकर हायस्कूल बंद पडल्यानंतर स्थापन झालेल्या बचाओ कृती समितीने केलेल्या सर्वेक्षणात महापालिकेच्या शैक्षणिक अधोगतीचे हे वास्तव पुढे आले आहे. समितीचे समन्वयक संतोष जाधव यांच्या पुढाकारातून हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. सद्यस्थितीत नाशिक शहरात महापालिकेच्या प्राथमिकच्या १२७ तर माध्यमिकच्या ११ शाळा अस्तित्वात आहेत. खासगी शाळांची संख्या १९२ इतकी आहे. त्यात इंग्रजी व मराठी विनाअनुदानित, अनुदानित व काही अनधिकृत शाळांचाही समावेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सरकारी व खासगी शाळांची संख्या जवळपास समान होती. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय शाळांना गळती लागली. आता खासगी शाळांची संख्या महापालिकेच्या शाळांपेक्षा ५४ ने अधिक आहे. महापालिकेच्या एकूण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ३८ हजाराच्या आसपास आहे. मध्यवर्ती भागातील केवळ २१ खासगी शाळांमध्ये ही पटसंख्या आहे. पटसंख्या झपाटय़ाने कमी होत असून त्याची कारणे सर्वेक्षणात शोधण्याचा प्रयत्न झाला. महापालिकेची स्थापना झाल्यापासून बंद पडलेल्या शाळांची संख्या जवळपास ३१ आहे. म्हणजे प्रत्येक वर्षांला एक यानुसार पालिकेच्या शाळा बंद पडत असल्याचे निदर्शनास येते. तथापि, पालिकेच्या म्हणण्यानुसार या शाळा बंद पडत नाहीत तर त्या इतर शाळेत विलीन केल्या जातात. परंतु, प्रशासनाचा हा दावा फोल ठरल्याचे दिसून येते.
पालिकेची शाळा क्रमांक ३२ बंद पडून आता ध्रुवनगर येथे सुरु आहे. शाळा क्रमांक ६० भारतनगर येथे स्थलांतरीत झाली. ४४, ५२ व ५२ शाळाही याच पध्दतीने स्थलांतरीत झाल्या. बी. डी. भालेकर हायस्कूलचे उदाहरण लक्षात घेतल्यास स्थलांतरीत व विलीनीकरण यातील मेख लक्षात येईल. गोरगरीबांच्या वस्तीतील ही शाळा आठ ते दहा किलोमीटरवर स्थलांतरीत करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही शाळांचे अजब विलीनीकरण झाले. त्यात घनकर लेनमधील पालिकेची शाळा बजरंग वाडीत, पंचशीलनगरची नागझरी, गणेशवाडीतील शाळा पोलीस मुख्यालयातील शाळेत झालेले विलीनीकरण ही त्याची काही उदाहरणे. स्थानिक वस्तीतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग एकप्रकारे खंडित केला गेला. कारण, अनोळखी परिसरात दूरवर विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. यामुळे स्थलांतरीत शाळेत पाठविण्यास पालकही तयार नसतात. आजवर पालिकेने कित्येक शाळा बंद करून त्यास विलीनीकरणाचे नांव दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  काही शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याने विभाजन करण्यात आले. कारण, आधीच्या काही शाळा स्थलांतरीत झाल्या. पण, या विभागाची तऱ्हा न्यारी आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांना त्याच जागेवर नोकरी हवी असते. यामुळेही स्थलांतर-विभाजन होत असते, असे निरीक्षण समितीने नोंदविले आहे.  गुणवत्तेअभावी आणि उदासिन वृत्तीमुळे पालिकेने प्राथमिक शिक्षणाचे धिंडवडे काढल्याचे उघड होत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
बंद पडलेल्या शाळांमध्ये मद्यपान
बंद पडलेल्या शाळांच्या इमारतींचा वापर राजरोसपणे मद्यपान करणे व इतर अनिष्ट बाबींसोबत काही ठिकाणी योग विद्या धाम सारख्या प्रशिक्षण वर्गासाठी तर काही इमारतीत चक्क पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू असल्याचे दृष्टीपथास पडते. वास्तविक, स्थलांतरीत वा बंद पडलेल्या शाळांची जागा केवळ शालेय कामकाजासाठी वापरल्या गेल्या पाहिजे असा शासनाचा दंडक आहे. महापालिकेने हे आदेश धाब्यावर बसवून उपरोक्त प्रकारांकडे कानाडोळा करण्याचे धोरण ठेवले आहे.
शहरात आजपर्यंत ३१ शाळा बंद पडल्या असल्या तरी त्यांच्या इमारतींचा वापर शैक्षणिक वगळता इतर सर्व उपक्रमांसाठी केला जात असल्याचे चित्र आहे. त्यातही काही शाळांच्या इमारतींना कोणी वाली नसल्याने त्यावर टवाळखोरांचा कब्जा आहे. गाडगे महाराज ट्रस्ट लगतची बंद पडलेली शाळा हे त्याचे उदाहरण. या ठिकाणी बुधवारी दुपारी टवाळखोर राजरोसपणे मद्यपान करत बसले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी छायाचित्र काढण्यास गेले असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घनकर लेनमधील बंद पडलेल्या शाळेच्या जागेवर जलकुंभ उभारण्यात आला. हरिबाई अग्रवाल शाळा क्रमांक ३२ ही मराठी शाळा बंद असून तिची जागा मोकळी पडली आहे. काही शाळांच्या जागेवर व्यापारी संकुल उभारले गेले. नेहरूनगर भागातील शाळेच्या इमारतीतून पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. बंद पडलेल्या बहुतांश शाळांच्या इमारती बेवारस पडलेल्या आहेत. महापालिकेने या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्याची दक्षता घेतली नाही. परिणामी, काही शाळांच्या इमारती टवाळखोरांचे अड्डे बनतात की काय, अशी स्थानिकांना साशंकता आहे.