डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि रंगभूमीवर विक्रमी १० हजार ७००वा प्रयोग करणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम आणि महापौर सुनील प्रभू यांनी अनुक्रमे प्रस्ताव मांडले होते. त्याला बुधवारी मान्यता देण्यात आली.
दादर येथील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी, यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेत याबाबत सकारात्मक निर्णय दिला. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात यावा, असा ठराव विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. या ठरावाला सर्वपक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिली. तर, यंदा रंगभूमीवर विक्रमी १० हजार ७००वा प्रयोग करून मराठी रंगभूमीचे नाव मोठे करणाऱ्या प्रशांत दामले यांचा सत्कार करण्याचा ठराव महापौर सुनील प्रभू यांनी मांडला होता. प्रशांत दामले यांनी हा विक्रम करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान पटकावले आहे. याची दखल घेत महापालिकेने दामले यांच्या सत्कारालाही मान्यता दिली. हे दोन्ही सत्कार कधी करण्यात येतील, याबाबत मात्र काहीच सांगण्यात आलेले नाही.