मुंबई महापालिकेने आपल्या शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रिलायन्स, डी मार्ट आदी २९ कंपन्यांना मदतीसाठी साद घातली आहे. यामुळे जूनपासून पालिका शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट कानावर पडणार आहे.
जवळपास सर्वच शाळांमध्ये ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेनेही आता आपल्या शाळांमध्ये ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात येत्या जूनपासून पालिकेच्या १०० शाळांमध्ये हे वर्ग सुरू होत आहेत. एका वर्गामध्ये २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून या शाळा चालविण्यासाठी बडय़ा खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा पालिकेचा विचार आहे. या वर्गातील शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक साहित्य आदीसाठी बडय़ा कंपन्यांना साकडे घालण्यात येणार आहे. यामध्ये रिलायन्स, डी मार्ट आदी कंपन्यांचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने दिली.
ज्युनिअर आणि सिनिअर केजी वर्ग सुरू करण्याबाबत येत्या २४ एप्रिल रोजी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यात या वर्गाच्या स्वरूपाबाबत अंतीम निर्णय घेण्यात येणार आहे. हे वर्ग पालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात येणार असले तरी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्याची सर्व जबाबदारी २९ कंपन्यांवर सोपविण्याचा पालिकेचा विचार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्युनिअर केजीपासूनच शिक्षण घेता यावे यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालिका शाळांमध्येही बाल्यावस्थेपासून विद्यार्थ्यांची जडणघडण होऊ शकते हे या वर्गाच्या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ, असा निर्धार शिक्षणाधिकारी शांभवी जोसी यांनी व्यक्त केला.