योग्य आहार, व्यायाम, व्यसनमुक्ती आणि सकारात्मक विचार हा हृदयरोगावर उपाय आहे, असे प्रतिपादन डॉ. मनोज चोपडा यांनी केले. येथील केटीएचएम महाविद्यालयात वाणिज्य प्रयोगशाळेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत ‘युवकांमधील हृदयविकाराचे वाढते प्रमाण’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. घुमरे, उपप्राचार्य एस. सी. पाटील, संयोजक श्रीकांत जाधव व्यासपीठावर होते. भारतीयांमध्ये कोलेस्टेरॉलपेक्षा फॅटचे प्रमाण अधिक आहे. पैशाने आरोग्य विकत घेता येत नाही. दररोज पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा. दूध, तेल, तूप, गोड, मीठ यांचा किमान वापर करावा. दररोज किमान दहा हजार पावले चालवावीत. सायकलचा वापर वाढवावा. १९९५ पर्यंत पन्नाशीनंतर हृदयविकार होत असत, मात्र आता ऐन विशी किंवा तिशीत हृदयविकार होत आहे. चुकीची जीवनशैली, नकारात्मक विचार हेही त्यामागील एक कारण आहे. भारतात एकूण रुग्णांपैकी १५ ते १८ टक्के रुग्ण हृदयविकाराचे आहेत. छातीमध्ये किंवा परिसरात वेदना होणे, घाम, चक्कर येणे, अ‍ॅसिडिटी, दाढेखाली, पाठीच्या मध्यभागी किंवा डाव्या हातात वेदना ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.
हृदयविकाराचा झटका आल्यास पहिले तीन तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. वयाच्या तिशीनंतर नियमित आरोग्य तपासणी करावी. नकारात्मक विचार, अपुरी झोप, वजन वाढणे, सिगारेट सेवन, तणाव यामुळे हृदयविकार बळावतो, असेही डॉ. चोपडा यांनी सांगितले. प्रा. डी. जी. पोटे यांनी सूत्रसंचालन केले.