शेती खरेदीचा फेरफार न लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील इरळद येथील तलाठी रमेश त्र्यंबक लटपटे यास लाचलुचपत विभागाने पकडले.
इरळद येथील किशन जयवंत सोनवणे यांनी या बाबत तक्रार दिली. गट क्रमांक ३५मधील शांताबाई सीताराम पुरी यांची अडीच एकर जमिनीचा गावातील लक्ष्मण मारोती वैद्य याच्यासोबत विक्रीचा सौदा ठरला होता. नोंदणीच्या दिवशी २ लाख ५ हजार रुपये देण्याचे, उर्वरित १ लाख ८० हजार रुपये रक्कम १५ दिवसांत देण्याचे ठरले व नंतर फेरफार करण्यात येणार होता. ठरल्याप्रमाणे ७ जानेवारीला मानवतला नोंदणी झाली. वैद्य यांनी २ लाख ५ हजार रुपये दिले. १५ दिवसांनी वैद्य यांच्याकडे उर्वरित रक्कम मागितली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पसे देण्याचे टाळले. त्यामुळे सोळंके व शांताबाई पुरी यांनी तलाठी लटपटे याच्या मानवत येथील किरायाच्या घरी जाऊन भेट घेतली व शेती खरेदीचा फेरफार वैद्यच्या नावावर लावू नका, असा अर्ज दिला. परंतु लटपटेने या साठी ५ हजार रुपये मागितले. तलाठी लटपटेने मंगळवारी सोळंके यांना पसे घेऊन घरी बोलविले. सोळंके यांनी लाचलुचपतकडे तक्रार केली. या तक्रारीवरून बुधवारी लटपटेच्या घरी सापळा लावला. या वेळी त्याला लाच घेताना पकडण्यात आले.
लाचलुचपतचा टोल फ्री क्रमांक
परभणीतील लाचलुचपतच्या टोल फ्री क्रमांकाची सुरुवात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. हा क्रमांक २४ तास उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी १८००२७०११०१ या क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी दिली.