खालापूर येथील कारखानदाराला कारवाई करण्याची धमकी देणाऱ्या लाचखोर कामगार अधिकाऱ्याचा पर्दाफाश नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. या कामगार अधिकाऱ्याचे नाव नारायण भोईर असे आहे. भोईर हा मागील दोन वर्षांपासून खांदेश्वर येथील विघ्नहर्ता इमारतीमधील कामगार विभागाच्या कार्यालयात कामगार अधिकारी या पदावर काम करीत आहे. यापूर्वी भोईर याच्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी होती. पदोन्नतीनंतर भोईर याला खालापूर परिसरामध्ये कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कामगार विभागाने सोपविली. भोईर याने संबंधित कारखानदाराला कारवाईचा बडगा दाखवून कारवाई करण्याची भीती दाखविली होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने सदर कारखानदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत कारखानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून भोईर याच्यावर पाळत ठेवण्यात आल्याची माहिती नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विवेक जोशी यांनी दिली. भोईर याने या कारखानदाराकडे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी पनवेल शहरात सायंकाळी पाच वाजता बोलाविले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून भोईर रंगेहाथ पकडले.