नगरभूमापन कार्यालयात फेरफार करून महापालिकेच्या अनेक जमिनी नागपूर सुधार प्रन्याससह इतर काही संस्था बळकावत असताना महापालिका प्रशासनाकडे त्याची माहिती नाही. नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केल्यावर या विषयावर चर्चेअंती शहरातील महापालिकेची मालमत्ता जर दुसऱ्याच्या नावावर असेल तर ती महापालिकेच्या नावावर करण्यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती करण्याचे स्पष्ट निर्देश महापौर अनिल सोले यांनी दिले.
शांतीनगर परिसरातील बिनाकीजवळील हनुमान मंदिर व्यायाम शाळेच्या जागेवर समाज मंदिराचे निर्माण करून महापालिकेने ही जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. ही संपूर्ण जागा बांधकामासाठी हनुमान मंदिर व व्यायाम शाळेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
हा विषय नगर भूमापन कार्यालयाकडे अपिलात असून तो निर्णय प्रलंबित असल्याचे आयुक्त श्याम वर्धने यांनी सांगितले. त्याचवेळी तिवारी यांनी निर्णयाची प्रत महापौरांकडे सादर करून ही जागा संबंधीत संस्थेला हस्तांतरित करावी, अशी मागणी केली. नझुल व शासनाच्या मालकीच्या अन्य छोटय़ा जागा महापालिकेच्या मालिकीच्या असाव्यात यासंदर्भात शासनाचे आदेश आहेत. यानुसार शहरातील भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, या जागा ताब्यात घेणे सोडा पण महापालिकेचे अनेक भूखंड नागपूर सुधार प्रन्यास आणि इतर काही संघटनांनी बळकावले आणि महापालिका प्रशासनाला काहीच माहिती नाही असा आरोप केला.
चर्चेदरम्यान वर्धने यांनी १९३८च्या नकाशा सादर करून बिनाकी येथील जागा महापालिकेची असल्याचा दावा केला. त्यावर तिवारी यांनी एवढय़ा छोटय़ा जागेसाठी प्रशासन तत्पर आहे तर दुसरीकडे जगनाडे चौक, गोकुळपेठ मार्केट, गांधीबाग, बंगालीपंजा या परिसरातील भूखंडावर अतिक्रमण झालेले आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन चूप का? असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला. प्रफुल्ल गुडधे यांनी सोनेगावमधील महापालिकेच्या शाळेच्या जमिनीचे प्रकरण
समोर आणले. या संदर्भात वकिलांची नियुक्ती करून महापालिकेच्या जागा ताब्यात घेण्याचे निर्देश यावेळी
महापौर अनिल सोले यांनी सभागृहात दिले. सभागृहात शहरातील विविध भागातील नामकरण संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आले.