ही काही केवळ बालकथा नाही.. उलट मुंबईच्या कुशीत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या रहिवाशांना काहीसे सुखावणारी ही सत्यकथा आहे. कोणे एके काळचीदेखील नव्हे, तर अगदी कालपरवाची.. मुंबईच्या पश्चिम उपनगरात, गोरेगाव येथील म्हाडा कॉलनीच्या एका इमारतीतील रहिवाशांनी हा थरार ‘याचि डोळा’ अनुभवला. वाघाने कुत्र्याला पळवून लावले तर त्याची बातमी होत नाही. पण कुत्र्याने वाघाला पळवून लावले, तर नक्कीच ती बातमी होते. तीच ही बातमी..
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भक्ष्याच्या शोधार्थ मानवी वस्तीत शिरलेला एक भुकेला बिबटय़ा त्या रात्री म्हाडा कॉलनीत शिरला, आणि एका इमारतीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात तो दिसल्याबरोबर स्थानिक रहिवाशांची एकच तारांबळ उडाली. याआधीही कधीकधी या परिसरात बिबटय़ाने दर्शन दिल्याने, रहिवाशांमध्ये घबराट पसरली. या वसाहतीला लागूनच संजय गांधी उद्यानाची तटबंदी आहे. आतल्या बाजूला असलेल्या पाणवठय़ावर रात्रीच्या वेळी बिबटय़ांचे नेहमीच दर्शन घडते.. २६ फेब्रुवारीच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास, न्यू दिंडोशी हिल व्ह्य़ू सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबटय़ा दिसला, आणि काही क्षणांतच आवारातील कुत्र्यांचा आरडाओरडा सुरू झाला. बिबटय़ा आसपास आहे, याची त्यामुळे खात्रीच झाली, आणि एक भटके कुत्रे बिथरले.. आक्रमक होऊन या कुत्र्याने बिबटय़ाचा अक्षरश पाठलाग सुरू केला. कुत्र्यांच्या वासाने भूक भागविण्यासाठी जंगलातून वस्तीत शिरलेला हा बिबटय़ा अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरला, आणि शेपूट सावरत त्याने धूम ठोकली..पण जंगलातल्या रानवाटांना सरावलेल्या या बिबटय़ाला, सिमेटच्या या जंगलातून नेमके बाहेर कसे पडायचे हेच कळत नव्हते. तो सैरावैरा पळत होता. भेदरलेला कुत्रा पुढे आणि आक्रमकपणाने त्याचा पाठलाग करणारा कुत्रा मागे, असे हे ‘बातमीमूल्य’ असलेले दृश्य पाहात दुसऱ्या दिवशी सर्व रहिवाशांनी सुटकेचा श्वासही सोडला. रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या कलकलाटाने करवादून त्यांना लाखोली वाहणाऱ्या अनेक रहिवाशांनी त्या प्रसंगानंतर मात्र, कुत्र्यांना मनोमन धन्यवाद दिले..
या प्रकाराने घाबरलेल्या रहिवाशांनी पोलिसांना कळविले. पुन्हा रात्री बिबटय़ा आला तर, काहीतरी करावयास हवे, असे साकडेही पोलिसांना घातले. रात्री सव्वाअकराच्या सुमारास पोलीस आले, आणि आपापसात बोलत असतानाच पुन्हा कुत्र्यांचा आरडाओरडा सुरू झाला. रहिवाशांनी चमकून इकडेतिकडे पाहिले. संजय गांधी उद्यानाच्या संरक्षक कठडय़ावर बिबटय़ा आरामात उभा होता.. त्याला घाबरवण्यासाठी फटाके वाजवा असे कुणीतरी इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना सुचविले, पण तेवढय़ात पुन्हा तो भटका कुत्रा आक्रमक झाला, आणि जबडा वासून त्याने कठडय़ाकडे धाव घेतली. पुन्हा एकदा बिबटय़ाने माघारी फिरून धूम ठोकली, आणि जणू काहीच घडले नाही अशा थाटात तो कुत्रा शांतपणे परतून इमारतीच्या भिंतीशी विसावला..
तीन वर्षांंपूर्वी कधीतरी असाच एक बिबटय़ा या आवारात अवतरला होता. तेव्हाही आसपासच्या भटक्या कुत्र्यांनी त्याला परतवून लावले होते. या इमारतीत राहणारे अनेकजण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतात. रात्रीही उशीरा घरी परततात. वारंवार अवतरणाऱ्या बिबटय़ामुळे रहिवाशांमध्ये घबराट असली, तरी परिसरातील भटके कुत्रे आता या रहिवाशांसाठी रक्षणकर्ते बनले आहेत. बिबटय़ाचा एकटय़ाने पाठलाग करून त्याला पळवून लावणारा तो धाडसी कुत्रा तर, आता सोसायटीतील सर्व रहिवाशांचा ‘हिरो’ झाला आहे..