कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी पकडलेली व पांझरापोळ गो शाळेच्या हवाली केलेली २५ जनावरे कसायाच्या ताब्यात देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने चार आठवडय़ांची स्थगिती दिली आहे. येथील पांझरापोळ गो शाळेतर्फे या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली. दरम्यान, ही जनावरे परत करावीत असा आग्रह धरत पांझरापोळ गो शाळेसमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आसिफ शेख यांच्यासह चार जणांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

कत्तलीच्या हेतूने एका मालमोटारीत कोंबून जनावरांची वाहतूक केल्याच्या संशयावरून गेल्या महिन्यात पोलिसांनी सलीम खान कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पकडलेली २५ जनावरे पोलिसांनी गो शाळेच्या हवाली केली होती. ही जनावरे परत मिळावीत, यासाठी कुरेशीने केलेला अर्ज २९ मार्च रोजी न्यायालयाने मंजूर केला. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध गो शाळेतर्फे वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात आले तरी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती दिली गेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ही जनावरे परत मिळावीत, असा आग्रह धरत ३ एप्रिल रोजी काही कसाई मंडळी गो शाळेसमोर येऊन धडकली तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ही जनावरे देण्यास नकार देण्याची भूमिका गो शाळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. उभयपक्षी घेतल्या गेलेल्या ताठर भूमिकेमुळे काही काळ येथे वातावरण निर्माण झाले होते.  त्यामुळे गो शाळेजवळ पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. यानंतर या लढाईत
शहर काँग्रेसचे अध्यक्ष आसिफ शेख यांनीही  उडी घेतली. ही जनावरे कसायांना परत केली नाही तर ८ एप्रिल रोजी पांझरापोळ गो शाळेसमोर  धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला
होता. त्यामुळे पोलीस दलासमोर धर्मसंकट उभे राहिले.  दरम्यान, गो शाळेतर्फे मुंबईच्या उच्च न्यायालयात ही जनावरे कसायांच्या ताब्यात देऊ नयेत म्हणून एक रीट याचिका दाखल करण्यात आली. त्यावर कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयास चार आठवडय़ांची स्थगिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, आसिफ शेख हे धरणे आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी त्यांना व त्यांच्या चार समर्थकांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आधीच अटक केली. नंतर या सर्वाना सोडून देण्यात
आले.
या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गो शाळा संस्थेचे अध्यक्ष केशरीचंद मेहता यांनी शहरात गो वंशाची मोठय़ा प्रमाणावर अवैध कत्तल होत असून रोज हजारावर जनावरांचे मांस येथून मुंबईकडे निर्यात होत असल्याचा आरोप केला. बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये होणाऱ्या जनावरांच्या कत्तलीकडे व मांस वाहतुकीकडे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या वेळी संस्थेचे पदाधिकारी मोहनलाल सराफ, रमेश ओस्तवाल, रघुवीर पाटोदिया, सज्जन टिबडेवाल आदी उपस्थित होते.