अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शिवारात तब्बल ९५७ एवढय़ा विक्रमी संख्येत क्रौंच (डेमोसाईल क्रेन्स) पक्ष्यांची नोंद घेण्यात आली. दिशा फाउंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील व त्यांचे सहकारी हे नियमित हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी गेले असता दर्यापूर परिसरातील शेतात ते दिसून आले. एवढय़ा मोठय़ा संख्येने या पक्ष्यांची महाराष्ट्रातली ही पहिलीच नोंद आहे. तर भारत आणि आशियातील ही दुसरी मोठी नोंद असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कांडय़ा करकोचा या नावाने परिचीत असलेल्या क्रौंच या पक्ष्याला उत्तर भारतात कुंज नावानेही ओळखले जाते. महर्षी वाल्मिकी यांनी रचलेल्या रामायणमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. याच्या इंग्रजी व्ही आकार करून समूहाने उडण्याच्या पद्धतीवरून महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धात सैन्यरचना केली गेल्याचा उल्लेख आढळतो. युरेशिया, सायबेरिया, डेन्मार्क, जर्मनी, ग्रीस व रोमानिया या देशातून हा स्थलांतर करून ते येतात. त्यांचे स्थलांतरण सगळयात कठीण मानले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात हे एकत्र येऊन समूहाने उडायला सुरुवात करतात. १६ हजार ते २६ हजार फूट उंचीवरून उडत हिमालय पर्वतरांगा पार करून आपल्या भागात येतात. मार्च महिन्यादरम्यान ते परतीच्या प्रवासाला लागतात. ‘ग्रुडी’ कुळातील हे पक्षी असून शास्त्रीय भाषेत ‘ग्रस वर्गो’ या नावाने ओळखले जातात. समूहाने उडणाऱ्या या पक्ष्यांचे स्थलांतर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. डोक्यावर व पोटावर लांब काळया रंगाची पिसे व झुपकेदार काळ्या रंगाचे शेपूट आणि सर्व शरीर राखडी रंगाचे असते. गर्द लाल रंगाच्या डोळयामुळे ते आकर्षक दिसतात. क्रेन प्रकारातील हा सगळयात लहान क्रेन पक्षी असून यांचा पंखांचा विस्तार १५५ ते १८० सेंटीमीटर असतो.
गहू, हरभरा व इतर पिकावरील कीटक व कोळी, गवतावरील नाकतोडे, पाण्यातील कीटक व खेकडे हे यांचे मुख्य खाद्य असून हे पक्षी मिश्रहारी आहेत. विदर्भात मोठय़ा प्रमाणात हरभरा व गव्हाची शेती केली जाते. हरभरा व गहू पिकावरील किडे यांच्या आवडीचे आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हरभरा व गहू व खरीप पिकांची शेती या पक्ष्यांना अप्रत्यक्षरित्या लाभदायक ठरली असून या पक्ष्यांचे आगमन शेतकऱ्यांनासुद्धा फायद्याचे ठरले आहेत. क्रौंच पक्षी दरवर्षी मुक्कामाचा परिसर बदलवत आहेत.
रात्री तलावाच्या काठावर आराम आणि सकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यान शेतशिवारात ते चरायला जातात. दुपारी १२च्या दरम्यान तलावावर परत येऊन पाणी पिऊन व आराम करुन दुपारी ३ च्या दरम्यान चरायला निघून जातात ते थेट सायंकाळी ६ दरम्यान परत येतात. हे पक्षी फार संवेदनशील असून मनुष्याचा वावर त्यांना अजिबात सहन होत नाही. थोडीही चाहूल लागली तरी ते जागा बदलतात. त्यामुळे पर्यावरण संतुलन तसेच शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या या पक्ष्याचे संरक्षण करण्याचे आवाहन दिशा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.