येथील मविप्र समाज संस्थेच्या वाघ गुरुजी विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे डोळ्याला दुखापत झाल्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेबद्दल पालकांची कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर जाणीवपूर्वक शिक्षकांविरूध्द तक्रार करण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे.
गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरुजी शाळेत ११ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. इयत्ता आठवीच्या वर्गात हजेरी सुरू होती. वर्गशिक्षिका एस. व्ही. शिंदे यांनी सार्थक शिंदेचे नाव पुकारले. स्वत:चे नाव तसेच क्रमांकाचा पुकारा होऊनही त्याने उत्तर दिले नाही. याचा राग आल्याने शिंदे यांनी सार्थकला मारले आणि त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले आहे. शाळा सुटल्यावर पालकांनी मुख्याध्यापक तसेच वर्गशिक्षकांना जाब विचारला. पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.  या संदर्भात शाळा व्यवस्थापन व पालकांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर संबंधित शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली. मुख्याध्यापक पी. टी. साळवे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित पालकांनी शाळेला सहकार्य राहील, असे आश्वासन दिले होते. या प्रकरणात शिक्षिकेची काही चुक नाही. मात्र पालकांनी दिलेला शब्द का फिरवला की ते जाणुनबुजून काही करत आहे हे समजत नसल्याचे साळवे यांनी सांगितले.