परळच्या ग्लोबल रुग्णालयात झालेल्या चोरीप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी रुग्णलयाच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. गणेश पालेकर (२६) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. पत्नी आणि आईच्या उपचारासाठी ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.  परळमधील ग्लोबल या खासगी रुग्णालयात २५ ऑक्टोबर रोजी ९ लाख ७७ हजार रुपयांची रोकड चोरी झाली होती. रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरील कॅशरूम खोलीतील कपाटातून ही रक्कम चोरण्यात आली होती. भोईवाडा पोलिसांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली होती. यावेळी सुरक्षा रक्षक गणेश पालेकर याच्या जबाबात विसंगती आढळली. अधिक चौकशीत त्याने चौरीची कबुली दिली. आईच्या तसेच पत्नीच्या आजारपणाच्या उपचारासाठी ही चोरी केल्याचे त्याने सांगितल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोंडवळकर याने दिली.
पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल
कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पदपथावर फिर्यादी पावभाजीचा व्यवसाय करतो. नंदीमठ यांनी त्याच्याकडे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी एक हजार रुपयांचा मासिक हप्ता मागितला होता. त्याविरोधात  तक्रार दाखल केली होती. चौकशीत नंदीमठ यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्लील चाळे करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक
रुग्णालयात महिलांना आंघोळ करताना चोरून बघणाऱ्या कर्मचाऱ्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. परमशिवम नाडर (४०) असे या आरोपीचे नाव आहे. तो बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात केअर टेकरचे काम करतो. मंगळवारी सकाळी एक महिला रुग्णालयाच्या न्हाणीघरात  आंघोळ करत असताना तिला काही चमकणारी वस्तू दिसली. त्यावेळी बाजूच्या न्हाणीघरातून नाडर आरशाच्या मदतीने तिला बघत असल्याचे लक्षात आले. तिने आरडाओरड केला असता रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी मदतीला आले. त्यांनी पकडून नाडरला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडील आरसा जप्त करण्यात आला आहे. असा प्रकार तो नियमित करत असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. नाडरला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त
बनावट नोटा वितरीत करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा ८ च्या पथकाने सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून ६ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. एकजण बनावट नोटा घेऊन विलेपार्ले येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ८ च्या पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते यांनी सापळा लावून रशीद शेख (३७) याला अटक केली. झडतीमध्ये त्याच्याकडे एक हजारांच्या एकूण सहा लाख बनावट नोटा सापडल्या. तो कल्याण येथे राहणारा आहे. मुंबईत बनावट नोटांचा वापर वाढला असून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही एक विशेष पथक स्थापन केल्याची माहिती दीपक फटांगरे यांनी दिली. या नोटा कुठून आणल्या आणि या टोळीत अन्य कोण आहेत, त्याचा आम्ही तपास करत आहोत असेही त्यांनी सांगितले.