उरण तालुक्यातील कोप्रोली येथील एका खूनप्रकरणी पॅरोलवर मिळालेल्या रजेत तीन वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीस उरण पोलिसांनी पनवेल येथे अटक केली आहे.
संतोष ऊर्फ गिरीश यशवंत म्हात्रे याला कोप्रोली येथील एका खूनप्रकरणी न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तो नाशिकच्या तुरुंगात ही शिक्षा भोगत होता. डिसेंबर २०११ ला त्याला पॅरोलची रजा मिळाली होती. मात्र त्याची मुदत संपल्यानंतर तो हजर न होता मागील तीन वर्षांपासून फरारी होता. याची माहिती नाशिक तुरुंग अधिकाऱ्यांनी उरण पोलिसांना दिली होती. उरण पोलिसांनी तपासाअंती त्याचा मोबाइल नंबर व एटीएम कार्डचा तपशील मिळवला होता. त्यावरून गिरीश म्हात्रे याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तो पेणमध्ये असल्याचा सुगावा लागला असता पोलिसांनी सापळा रचून म्हात्रे याला अटक केली, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.एम. आव्हाड यांनी दिली. त्याला उरण पोलिसांनी नाशिकच्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.