* १६६ केंद्रांवरील प्रात्यक्षिक परीक्षा प्रभावित
* संपकर्त्यां प्राध्यापकांवर कारवाई?
* विद्यार्थी संघटना झोपलेल्याच
प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनाची झळ परीक्षा विभागाला बसली असून तब्बल १६६ केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. प्राध्यापकांनी गेल्या चार फेब्रुवारीपासून परीक्षेसंबंधीच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकला असल्याने प्रात्यक्षिक परीक्षा कमालीच्या प्रभावित झाल्या आहेत. गेल्या ३० जानेवारी ते येत्या ३० मार्च दरम्यान विविध अभ्यासक्रमाच्या पूर्वघोषित प्रात्यक्षिक परीक्षांचे कामच करणार नसल्याचे प्राध्यापकांनी प्राचार्यामार्फत विद्यापीठाला कळवले होते. त्यामुळे ३० जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत थोडय़ाफार प्रात्यक्षिक परीक्षा उरकल्या. मात्र त्यानंतरच्या परीक्षा प्रभावित झाल्या आहेत.
चार फेब्रुवारीपासून झालेल्या २०१ केंद्रांवरील प्रात्यक्षिक परीक्षांपैकी १६६ केंद्रांवर अंतर्गत व बहिर्गत परीक्षकच उपलब्ध होऊ न शकल्याने परीक्षा होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी प्रकुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी यांनी प्रात्यक्षिकांची तारीख पुढे ढकलण्याची वर्तवलेली शक्यता बळकट झाली आहे. मात्र महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ३२(५)(जी) नुसार परीक्षेच्या कामात सहकार्य न करणाऱ्या प्राध्यापकांवरील कठोर कारवाई खरेच केली जाणार का? यावर सर्वाचे लक्ष लागले आहे.अशीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळी लेखी परीक्षाही प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे. हा आगामी धोका टाळण्यासाठीच आजही परीक्षा मंडळाची(बीओई) तातडीची बैठक घेण्यात आली. सर्व अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत शासनाने प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन पुढील अनागोंदी टाळावी, अशी सूचना करणारे पत्र शासनाला पाठवण्याचा निर्णय बीओईने घेतला आहे.  दरम्यान   आंदोलन अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे असल्याने प्राध्यापकांची संघटना एमफुक्टोने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी परीक्षेवरील बहिष्काराचा मार्ग मवाळ करावा, अशीही भूमिका काही अधिष्ठात्यांनी घेतली आहे. दरम्यान प्राध्यापकांच्या आंदोलनाचा तीव्र निषेध करणाऱ्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या गांधीगिरीला भीक न घालणाऱ्या प्राध्यापकांच्या संपाचा आजचा नववा दिवस आहे. मात्र अद्याप कोणतीही संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांचे भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समोर आलेली नाही.