कष्टाच्या पशाने खरेदी केलेल्या घरामध्ये आयुष्याची संध्याकाळ कुटुंबीयांसोबत घालविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु चारित्र्यावरील संशयातून पत्नीने घरात प्रवेश  नाकारल्याने पन्नाशी ओलांडलेल्या पतीला कधी इमारतीची गच्ची, कधी बस थांबे, तर कधी गेस्ट हाऊसमध्ये दिवस काढावे लागले. मात्र त्याच्याच कष्टातून खरेदी केलेल्या घरातून त्याला हाकलून देणे आणि नंतर त्यास घरात घेण्यास नकार देणे ही पत्नीची वागणूक क्रूरताच आहे, असा निर्वाळा कुटुंब न्यायालयाने देत पतीला घटस्फोट मंजूर केला.  
मुलुंड येथील या दाम्पत्याचा १९८६ मध्ये विवाह झाला होता. परंतु पतीचे एका चिनी बाईशी संबंध असल्याचा संशयावरून पुढे या दाम्पत्यामध्ये मतभेद होऊन खटके उडू लागले. विशेष म्हणजे या दाम्पत्याला २४ वर्षांचा मुलगा आहे. परंतु भांडणे आणि पत्नीची वागणूक एवढी टोकाला गेली की या पतीने अखेर २०११ मध्ये कुटुंब न्यायालयात धाव घेत काडीमोडासाठी अर्ज केला.
घटस्फोट अर्जानुसार, १० जुल २००९ रोजी दुपारी एकच्या सुमारास या दाम्पत्याच्या मुलाने वडिलांना फोन केला व पोलीस त्यांच्या शोधात घरी आल्याचे कळवले. पत्नीने तुमच्याविरोधात तक्रार नोंदवल्याचे सांगत पोलिसांनी या पतीला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले.
त्यानंतर तेथे या पतीला बराच वेळ बसविण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पत्नी पोलीस ठाण्यात गेली व पतीला घरातून बाहेर हाकलून लावा अन्यथा परिणाम वाईट होतील, असे तिने पोलिसांना धमकावले.
त्यामुळे दोन तासांमध्ये घर सोडले नाही तर अटक करू, अशी धमकी पोलिसांकडून आपल्याला देण्यात आली. पण नंतर पोलिसांनी आपल्याला घरी जाण्यास तसेच पत्नीचे मनपरिवर्तन होईपर्यंत घराबाहेर वाट पाहण्याचा सल्ला दिला. परिणामी इमारतीच्या बागेत तासन् तास ती घरी परतण्याची आपण वाट पाहत बसलो. आपल्यासोबत आपला मुलगाही आई घरी परतण्याची वाट पाहत बसला. रात्री साडेअकराच्या सुमारास पत्नी घरी परतली. पण तिने केवळ मुलाला घरात घेतले, आपल्याला घेण्यास नकार दिला.
त्यामुळे रात्र इमारतीच्या गच्चीत पावसात भिजत काढावी लागली. दुसऱ्या दिवशी आपण पोलीस ठाणे गाठले आणि घरातून आपले सामान घेण्याची परवानगी मागितली.
परवानगी मिळताच हतबल होऊन केवळ काही प्रमाणपत्र हाताशी घेऊन आपण घर सोडले, त्यानंतर १० दिवस कधी, इमारतीच्या गच्चीवर, कधी बस थांबे, तर कधी गेस्ट हाऊसमध्ये काढले व नंतर भाडय़ाने घर घेतले. तेथे वर्षभर काढल्यानंतरही पत्नीची वागणूक सारखीच राहिल्याने अखेर काडीमोडासाठी अर्ज केल्याचा दावा या पतीने अर्जात केला होता.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या त्रासानंतर तसेच पत्नीने घरात घेण्यास नकार दिल्यानंतर या पतीला भर पावसात १० दिवस बस थांब्यांवर काढावे लागले. एवढेच नव्हे, तर कष्टाच्या पशाने खरेदी केलेले घर सोडण्यासोबतच लोकांसमोर अशा लाजिरवाण्या पद्धतीने या पतीला अपमानित व्हावे लागले.
पत्नीने पतीला दिलेली ही वागणूक क्रूरताच आहे, असे कुटुंब न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश लक्ष्मी राव यांनी स्पष्ट करत या पतीला घटस्फोट मंजूर केला.