लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे अखेरचे स्थानक म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस. अनेकदा या गाडय़ा अडनिडय़ा वेळी स्थानकात येतात. स्थानकात उतरल्यानंतर साहजिकच लांबचा प्रवास करून आलेल्या प्रवाशाला घरी पोहोचण्याची घाई असते. अनेकदा त्याच्याकडे सामानाचे ओझे असते, त्यात किमती चिजा असतात, क्वचितप्रसंगी महागडय़ा वस्तू असतात, रोख रक्कमही असते. अनेकदा प्रवाशांना १८व्या फलाटापासून पायी येत स्थानकाबाहेर यावे लागते. स्थानकाबाहेर घुटमळणाऱ्या गर्दुल्ल्यांचे लक्ष अनेकदा अशा प्रवाशांवरच असते. या प्रकारांना आळा बसावा, प्रवाशांना सुरक्षितपणे स्थानकाबाहेर पडता यावे यासाठी मध्य रेल्वने अलीकडेच जुन्या पादचारी पुलाची लांबी वाढवली. देशातील सर्वात मोठा पादचारी पूल अशी शेखीही मध्य रेल्वेने मिरवली. मात्र, तरीही प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आहे ती आहेच..
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फलाट क्रमांक एक ते १८ ला जोडणारा भव्य अशा या पादचारी पुलाची लांबी तब्बल ३६४ मीटर आहे. त्यापैकी २७० मीटर लांबीचा पूल नव्याने बांधून तो जुन्या पादचारी पुलाला जोडण्यात आला. गेल्याच महिन्यात या पुलाचे शानदार उद्घाटनही झाले. मात्र, अजूनही या पुलावरून जाण्यास प्रवासी घाबरतात, खासकरून रात्रीच्या अंधारात. हा पूल लांब आणि वळणदार आहे. तसेच तो स्थानकाच्या अगदी टोकाच्या बाजूला असल्याने येथे वर्दळही कमी असते. पादचारी पूल स्थानकाबाहेर उतरणाऱ्या पुलाला जोडला असल्याने येथे गर्दुल्ल्यांचा मुक्त वावर असू शकतो अशी भीती आहे. त्यामुळे रात्री प्रवासी या पुलाचा वापर करणे टाळतात. माणसांचा वावरच कमी असल्याने येथे एकटय़ादुकटय़ा प्रवाशाला जाण्यास भीती वाटते. पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली होती. मात्र, अद्याप या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. शिवाय आरपीएफ जवानांचा राबता या पुलावर असला तरी तो तोकडाच आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना विचारले असता, लवकरात लवकर हे कॅमेरे बसवले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.