येथील देशस्थ ऋग्वेदी संस्थेतर्फे मंगळवारी दीप्ती कुलकर्णी-देशमुख यांचे ‘कल्चरल आर्ट एक्स्प्रेंज’ या विषयावर चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासह जगातील काही निवड कलांची ओळख या निमित्ताने होणार आहे.
श्री दुर्गा मंगल कार्यालयात सायंकाळी चार ते रात्री आठ या कालावधीत प्रदर्शन खुले राहणार आहे. या बाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुकर कावळे यांनी दिली. दीप्ती कुलकर्णी-देशमुख या अमेरिकेत न्यूजर्सी येथे स्थायिक आहेत. त्यांनी आपले अनेक ‘सोलो’ प्रदर्शन भारतात आणि अमेरिकेत भरविले आहेत. त्यांची बरीच चित्र विविध मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली आहेत. कुलकर्णी-देशमुख या संगणक अभियंता असून त्या मुळच्या नाशिकच्या आहेत. त्यांनी अनेक बहुराष्ट्रीय वित्त संस्थांमध्ये काम केले आहे. या प्रदर्शनात स्वत: अनुभवलेले आणि बघितलेले काही भारतातील व अन्य देशातील पारंपारिक कलांच्या २० चित्रांचा समावेश करण्यात येणार आहे. भारतातील कलमकारी, मधुबनी व वारली कला तर बाहेरच्या देशातील वेगवेगळ्या कलांची चित्रांद्वारे अनुभूती घेता येईल. चित्रकलेच्या माध्यमातून भारतातील वैविध्यपूर्ण कला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे परदेशातील कला भारतातील नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. ज्या त्यांनी स्वत: त्या त्या देशांना भेट देऊन आणि प्रत्यक्ष स्थानिक रहिवाशांबरोबर राहून अनुभलवल्या. कुलकर्णी यांच्या कलेचे वैशिष्टय़ म्हणजे नाविण्य, त्यांनी वापरलेले माध्यम, व्हायब्रँट कलर्स, टेक्स्च्र्स, कॉम्पोजिशन्स आणि स्टाईल आहे. या चित्र मालिकेसाठी कुलकर्णी यांना जवळ जवळ एक वर्ष लागले.