चैत्रोत्सवाच्या स्वागतासाठी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे नुकतेच एका सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमटे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चैत्रौत्सवाच्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती. यात ज्येष्ठ पत्रकार-   खासदार भारतकुमार राऊत, ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे, टिपटॉप प्लाझाचे रोहित शहा, ‘सुराज्य’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते विनायक प्रभू, चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष मांजरेकर, ‘व्हेक्टर प्रोजेक्ट्स’चे उमेश राव, अभिनेत्री पूजा सावंत, मृणाल ठाकूर, अभिनेते शरद पोंक्षे, वैभव तत्ववादी, ‘झी नेटवर्क’चे भूषण खोत, ‘लवासा समुहा’च्या अनुराधा पारसकर, डॉ. वावीकर, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, किशोर प्रधान, ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, श्रीकांत बापट, दीपक बगाव आदींचा समावेश होता.
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना मनाली देव आणि त्यांच्या गणेश कल्चरल अकादमीच्या सहकाऱ्यांनी या वेळी तालमणी मुकुंदराज देव यांच्या नव्या अल्बमवर सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आगामी ‘सुराज्य’या मराठी चित्रपटाची पहिली झलक उपस्थितांसमोर सादर करण्यात आली. याची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे.
चैत्रौत्सवाची सांगता खास शाकाहारी जेवणाने झाली. यात आमरस पुरीसह पाणी पुरी, चाट, महाराष्ट्रीयन, गुजराथी आणि दाक्षिणात्य पदार्थाचा समावेश होता.