सुखी जीवनाचा पदर धरत यशाची वाटचाल करायची असेल तर घरातून होणारे संस्कार आणि जवळील आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. सध्याची गोंधळाची सामाजिक परिस्थिती पाहता  तरूण पीढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अशाप्रकारच्या नववर्ष स्वागत यात्रांची खूप गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ उज्जवल निकम यांनी गुरूवारी येथे केले.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त संभाजी बलिदान दिनाचा कार्यक्रम भागशाळा मैदान येथे आयोजित केला होता. यावेळी अर्थतज्ज्ञ गिरीश जखोटिया, संत ललितदास गुरू महाराज, निवृत्त ब्रिगेडिअर अजित श्रीवास्तव, जयकृष्ण सप्तर्षी, सचिन कटके, वैद्य विनय वेलणकर, आमदार रवींद्र चव्हाण, राहूल दामले उपस्थित होते. सर्वागाने व्यापलेली भारतीय संस्कृती खूप ताकदवान आहे. जगात मंदीचे वातावरण आहे. परंतु, अद्याप आपणास त्याचा म्हणावा तसा स्पर्श झालेला नाही. विदेशी वातावरणात राहुनही भारतीय माणूस आपली संस्कृती जोपासतो. या यशामागे संस्कार, चिरकाल सुरू असलेल्या आपल्या कुटुंबव्यवस्थेचे महत्वाचे योगदान आहे. आताच्या टीव्ही वाहिन्यांच्या जमान्यात हे सर्व कोठे ढेपाळतय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध वाहिन्यांमधून दाखविल्या जाणाऱ्या मालिका, त्यामधील विचार आपणास कोठे घेऊन जात आहेत, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थीती आहे.  वाहिन्यांवरील चर्चामंथनातून नक्की आपला मार्ग कोणता हेच कळेनासे झाले आहे, असे निकम यांनी सांगितले.