* अधिकृत घरांची विक्री रोडावली
* महापालिकेचे दुर्लक्ष
* भूखंडमाफियांची दादागिरी सुरूच
डोंबिवली परिसरात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांमधील घरांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम दिसू लागला असून अनधिकृत इमारतींमध्ये स्वस्त दरात मिळत असलेल्या घरांकडे ग्राहकांचा अधिक ओढा असल्याचे धक्कादायक चित्र सध्या या परिसरात पाहावयास मिळत आहे. अधिकृत इमारतींमधील घरांच्या किमती प्रतिचौरस फुटास तीन हजारांपेक्षा अधिक आकडा गाठू लागल्या आहेत. तुलनेने अनधिकृत इमारतींमधील घरे स्वस्त मिळत असल्याने ही घरे मोठय़ा प्रमाणावर विकली जात असल्याचे रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
 कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. महापालिका हद्दीत तसेच आसपासच्या ग्रामीण भागात मोकळे भूखंड बळकावून चाळी-इमारती बांधण्याचे उद्योग राजरोसपणे सुरू आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील दिवा तसेच शीळफाटा पट्टय़ातही अशा बांधकामांना अक्षरश ऊत आला आहे. स्थानिक पुढारी आणि भूखंडमाफियांची अघोषित अशी युती या पट्टय़ात दिसू लागली आहे. विशेष म्हणजे, कल्याण- डोंबिवली महापालिकेतील अतिक्रमणविरोधी पथकाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून धडाधड उभ्या राहाणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडे कुणी ढुंकूनही पाहात नसल्याचे चित्र आहे. अशा बांधकामांमुळे शहरातील नियोजनावर विपरीत परिणाम होत असल्याचे एकीकडे दिसत असताना महापालिकेची अधिकृत परवानगी घेऊन गृहसंकुले उभारणाऱ्या विकासकांच्या व्यवसायावरही त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. शहरातील काही प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या मते डोंबिवली पश्चिमेतील अधिकृत गृहसंकुलातील घरांची विक्री काहीशी कमी झाली आहे. डोंबिवली पश्चिमेत ‘सीआरझेड’ क्षेत्रात खाडीकिनारी, शहरातील पालिकेच्या भूखंडावर भूमाफियांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत. या भागात पालिकेच्या मंजुरीने अधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. या अधिकृत गृहसंकुलातील घरांना पुरेशा प्रमाणात ग्राहक मिळत नसल्याचा दावा येथील विकासकांच्या संघटनेने केला आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिमेत गेल्या दीड वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशन परिसरात सदनिकांच्या विक्रीचा दर प्रतिचौरस फुटास सुमारे सहा ते आठ हजारापर्यंत होता. गणेशनगर, देवीचा पाडा, गरीबाचा पाडा, महाराष्ट्रनगर, मोठा गाव परिसरात चार ते पाच हजार रुपयांपर्यंत दर सुरू आहेत. हे तेजीचे दर विचारात घेऊन अनेक ग्राहकांनी अनधिकृत घरांकडे मोर्चा वळविला आहे. अशा अनधिकृत इमारतींमधील घरे १० ते २० लाखांमध्ये मिळत असल्याने या घरांची सर्वाधिक विक्री होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा वचक नसल्याने या इमारतींवर कारवाई होणार नाही, असे आश्वासन या इमारती उभारणाऱ्या माफियांकडून बिनधोकपणे दिले जात आहे. अनधिकृत इमारतींमध्ये १५ ते १७ लाखांत चांगली सदनिका विकत मिळते. जागेच्या कागदपत्रांची फारशी तपासणी ग्राहकांकडून होताना दिसत नाही. अनधिकृत चाळींमधील कोंबडय़ाच्या खुराडय़ाप्रमाणे भासणारी खोली सात ते आठ लाखापर्यंत मिळते. अशा खोल्यांनाही सध्या भलतीच मागणी आहे. अशीच परिस्थिती डोंबिवली पूर्व, ग्रामीण भाग, कल्याण पूर्व, टिटवाळा पट्टय़ात निर्माण झाली आहे.