तालुका मुख्यालय असलेल्या लोणार येथील महावितरण कार्यालयातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असून, ही पदे  भरण्यास विलंब होत असल्याने विद्युत ग्राहकांची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराबद्दल ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.
लोणार तालुक्यासाठी चार कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजूर असतांना एकच अभियंता आहे. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहतात. लोणार तालुक्यातील बिबी सर्कल वगळता इतर तीन सर्कलला अनेक महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता नाही. मे महिन्यात तीन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागपूर येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता खान यांची लोणार ग्रामीण, तर लोणार शहर भागासाठी घाटोळ व गुणवत्ता नियंत्रणासाठी नागपूरलाच कार्यरत असलेले राठोड यांची येथे बदली करण्यात आली होती. मात्र, या तीन अभियंत्यांपैकी एकही अभियंता येथे रुजू झालेला नाही. यातील दोन अभियंत्यांनी लोणार येथे येण्यास नकार देऊन आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतली आहे, तर घाटोळ यांनी लोणारला न जाण्यासाठी चक्क आजारपणाचे कारण पुढे करून दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या तीनही अभियंत्यांचा कारभार एकटय़ा सहाय्यक अभियंता सोनवणे यांच्याकडे असून संपूर्ण तालुक्याचा कारभार पाहतांना त्यांची दमछाक होते.  त्यामुळे असंख्य कामे रेंगाळली आहेत. वीज ग्राहकांच्या तक्रारी देखील प्रलंबित आहेत. सध्या पावसाळा आहे. त्यात गोदरेज अ‍ॅन्ड बॉईज कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. हिवराखंड येथील विद्युत जनित्राचे खोदकाम अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्यामुळे त्याचे खांब वाकलेले आहेत, तर अनेक ठिकाणी मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्यामुळे नागरिकांसह जनावरांचेही प्राण धोक्यात आले आहेत. याशिवाय, घरगुती आणि शेतातील विद्युत जोडण्याची कामे देखील कनिष्ठ अभियत्यांअभावी रखडली आहेत. शेतातील जोडणीसाठी कनिष्ठ अभियंत्याकडून अंदाजपत्रक तयार करणे आवश्यक असते. त्याशिवाय, नवीन जोडणी मंजूर होत नाही. देखभाल दुरुस्तीची अनेक कामे देखील अभियंत्यांअभावी पडून आहेत. महावितरणच्या या अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.