घरात गॅस सिलिंडरचा वापर करताना काही अपघात घडल्यास नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था असताना त्याबाबत माहिती नसल्याने मागील दहा वर्षांत शहरातील एकाही ग्राहकाने या स्वरूपाच्या नुकसान भरपाईसाठी दावाच केला नसल्याची बाब अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने उघड केली आहे.
ग्राहकांना स्वत: राहत असलेल्या जागी गॅस सिलिंडर वापरताना, वितरकांना सिलिंडर खरेदी, वितरण अथवा वाहतुकीदरम्यान, सिलिंडर एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी घेवून जाणाऱ्या वाहतुकदाराला सिलिंडरमुळे काही अपघात झाल्यास आणि त्यात शारीरिक अपाय अथवा स्थायी मालमत्तेचे नुकसान झाल्यास गॅस कंपनीकडून एक लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस, आयसोसी या कंपन्यांनी उपरोक्त कारणांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढलेला आहे. त्यामुळे असा अपघात घडल्यास ग्राहकांनी वितरकास सूचित करून नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करावा, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मेजर पी. एम. भगत यांनी दिली आहे. या सुविधेबाबत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी गॅस कंपनी अथवा वितरकांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.