उरणच्या द्रोणागिरी नोड परिसरातील सीडब्ल्यूसी गोदामातील कामगार शनिवारी आपल्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. मागील पाच महिन्यांपासून बंद पडलेले सीडब्ल्यूसीचे गोदाम पूर्ववत सुरू करून कामगारांचे पाच महिन्यांचे वेतन तसेच गोदामातील ३७३ कामगारांच्या वेतनातून कंत्राटदारांकडून कापण्यात आलेली १७ महिन्यांची १ कोटी ६० हजार रुपयांची न भरलेली प्राव्हेडंट फंडाची रक्क्म त्वरित भरणा करण्यात यावी या मागण्यांसाठी सीडब्ल्यूसी गोदामाच्या प्रवेशद्वारा समोर उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी होणार आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सीडब्ल्यूसीच्या नियंत्रणात चालणाऱ्या द्रोणागिरी नोड औद्योगिक परिसरातील द्रोणागिरी गोदामाची सुरुवात २२ वर्षांपूर्वी झालेली आहे. या गोदामात उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिक मिळून ३७३ कामगार काम करीत आहेत. या गोदामातील इतर कामकाजावर अवलंबून असलेल्यांची कामगारांची संख्या सातशेपर्यंत आहे. एप्रिल २०१४ पासून गोदामातील कामकाज बंद करून कंत्राटदाराने कामगारांची देणी न देताच आपल्या मशनरी गोदामातून नेल्या आहेत. एप्रिलपासून आजपर्यंत कामगारांना वेतनही देण्यात आलेले नाही. अकादास या कंत्राट कंपनीने कामगारांचे मागील १७ महिन्यांचे त्यांच्या हक्कांची प्राव्हिडंट फंडाची रक्कमही जमा केली नसल्याचे कामगारांचे नेतृत्व करणारे सीडब्ल्यूसी अंतर्गत कामगार संघटनेचे अध्यक्ष अरुण पाटील व सचिव आकाश भोईर यांनी दिली आहे. बंद पडलेले सीडब्ल्यूसीचे गोदाम सुरू करण्यासाठी कामगारांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच उरणमधील सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. या संदर्भात जेएनपीटीचे कामगार विश्वस्त भूषण पाटील यांनी सीडब्ल्यूसीचे व्यवस्थापकीय संचालक, संबंधित मंत्री यांची भेट घेऊन कामगारांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती देऊन गोदाम पुन्हा सुरू करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. यासाठी कामगारांनी दोन पावले मागे येण्याचीही भूमिका घेतली आहे. मात्र नव्याने येणाऱ्या कंत्राटदारांच्या कामगार विरोधी अटींमुळे चर्चेत अडथळा निर्माण झाला आहे.