पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनतेने जीवनशैली बदलताना आठवडय़ातून एकदा सायकल चालवावी, असे आवाहन आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय युवकांना केले. मोदींच्या या आवाहनाला भारतीयांचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे ठावूक नाही, पण नागपूरकर मात्र मोदींच्या आवाहनाच्या फार पूर्वीपासून सायकलचा जितका अधिक वापर करता येईल तितका करीत आहेत. केवळ फॅशनसाठी म्हणून नव्हे, तर सायकलींचा वापर करणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिक आणि एका इन्फोटिक व्यावसायिकाने अलिकडेच तब्बल एक लाख ६३ हजार रुपये किंमत असलेल्या ‘ट्रेक’ या अमेरिकन कंपनीच्या सायकलींची खरेदी केली.
बदलत्या आधुनिक जीवनशैलीने अनेक आजार माणसाने अंगावर ओढवून घेतले आहेत. पूर्वी ‘ब्लॅक अँड व्हाईट’च्या जमान्यात सायकल असणे, हे श्रीमंतीचे लक्षण होते आणि आता त्याच सायकल चालवणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, श्रीमंत म्हणून गणल्या जात असलेल्या युरोपात सायकल चालवणारे मोठय़ा संख्येने आहेत. परगावी किंवा सहलीला जातानासुद्धा गाडीच्या डिकीत ते एक-दोन सायकली नेतात आणि त्याचा वापरही करतात. युरोपसह इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्र्झलड, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटलीसह अनेक देशात युवक-युवती सायकलनेच प्रवास करतात. युरोपात फुटपाथला समांतर सायकल ट्रॅक आहेत आणि पादचाऱ्यांना त्यावर येण्यास मनाई आहे. भारतातही हळूहळू का होईना सायकल पुन्हा परत येत आहे. नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यासाठी का होईना सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याच्या जाणिवेतून चालवल्या जाणाऱ्या सायकलीने त्याचा पसारा मोठय़ा प्रमाणात वाढवला असून एकटय़ा नागपुरातच तब्बल चार सायकलींचे ग्रुप तयार झाले आहेत. सॅडल, हॅक, ऑरेंजर्स, जॅग्वार या चारही ग्रुपमधील सदस्यांची संख्या सारखी वाढत आहे. प्रत्येक शनिवार आणि रविवारी हे सदस्य कितीतरी किलोमीटर सायकलवारी करून येतात. त्यातूनच आता तयार झालेला मॉर्निग बायकर्स हा ग्रुप दररोज सकाळी सायकलवारी करून येतो. नागपुरातल्या कार्पोरेट संस्कृतीतही सायकलवरून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
दररोज २५ ते ३० किलोमीटर सायकलवारी करणाऱ्या नागपुरातील एका हॉटेल व्यावसायिक आणि एका इन्फोटेक व्यावसायिकाने तब्बल एक लाख ६३ हजार रुपये किंमत असलेल्या सायकलीची खरेदी केली.
जगातल्या सवरेत्कृष्ट पाचमध्ये येणाऱ्या ‘ट्रेक’ या अमेरिकन कंपनीच्या सायकली आता नागपुरातही सहल उपलब्ध आहेत.
गेल्या एक वर्षांत तब्बल १८० आंतरराष्ट्रीय सायकली विकल्या गेल्या आहेत. जॉयंट कंपनीची दहा लाखाची रुपयांची व २० ते २५ लाख रुपये किमतीच्या सायकलसुद्धा उपलब्ध आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ा विकत घेताना विचार करणारा नागपूरकर आता सायकलींसाठी एक लाखाहून अधिक किंमत मोजायला लागला आहे.
पूर्वी सायकलींसाठी २५ ते ३० हजार रुपयेसुद्धा अधिक वाटत होते, पण पावणे दोन लाख रुपयाच्या या खरेदीने नागरिकांचा सायकलींकडील कल वाढत असल्याचे सिद्ध केले आहे.