जेवणाच्या लाखो डब्यांची ने-आण करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या व्यवसायातून ‘व्यवस्थापन शास्त्रा’चा एक उत्तम आदर्श निर्माण केला. डबेवाल्यांच्या या व्यवस्थापनाचे कौतुक इंग्लंडच्या राजपुत्रानेही केले. शेतातील माल थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम लवकरच सुरु केला जाणार असून त्याची सुरुवात दक्षिण मुंबईतून होणार आहे. डबेवाल्यांच्या संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पाज हजार डबेवाल्यांकडून दररोज दोन लाख डब्यांची ने-आण केली जाते. या कामातून मिळणारे उत्पन्न वाढत्या महागाईच्या काळात पुरेसे नाही. त्यामुळे डबे पोहोचविण्याचे काम संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत अर्धवेळ काम करून काही पैसे मिळविण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील माल योग्य त्या दरात खरेदी करून मुंबईतील ग्राहकांना तो रास्त किंमतीत दिला जाणार  आहे.
सुरुवातीला चहा, साखर, गहू, तांदूळ, कांदे-बटाटे आदी माल ग्राहकांना विकला जाणार आहे. मिळणारा प्रतिसाद पाहून यात वाढ केली जाणार आहे. सुभाष सहकारी सेवा संस्था मर्यादित या संस्थेकडून थेट शेतकऱ्यांच्या शेतातून माल खरेदी करून संकटा प्रसाद चाळ, आंबेवाडी, काळाचौकी येथे आणला जाणार आहे. तेथील गोदामातून डबेवाल्यांना त्यांच्या मागणीनुसार तो वितरित केला जाणार आहे. उपक्रमाची सुरुवात गणेशोत्सवाच्या आधी काळाचौकी येथे होणार आहे.  माझे कुटुंब डबेवाल्याचे असल्याने डबेवाल्यांच्या मासिक उत्पन्नाची मला कल्पना आहे. डबेवाल्यांचे मासिक उत्पन्न वाढण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून ही कल्पना सुचली आणि आपण ती राबविणार आहोत. योजनेत सहभागी व्हायचे की नाही त्याचा निर्णय डबेवाल्यांनी घ्यावा, असे तळेकर यांनी सांगितले.