वाहने शिकण्यामध्ये युवा गट सर्वाधिक आघाडीवर आहे. दुचाकी, चारचाकी वाहने शिकण्यासाठी दररोज कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुमारे १४० वाहन मालक शिकाऊ प्रशिक्षणाचा परवाना घेण्यासाठी येत आहेत. पारदर्शक कारभार आणि अप्रशिक्षित वाहन चालकाला चालक परवाना मिळू नये यासाठी ‘आरटीओ’ कार्यालयातून ‘ऑनलाइन’ पद्धतीने शिकाऊ परवाने देण्यात येत आहेत, अशी माहिती कल्याणचे साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी दिली.
शिकाऊ परवाना मिळण्यासाठी वाहन मालक, चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रांगा लावण्यास लागू नये म्हणून परिवहन विभागाने ‘ऑनलाइन’ परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘ऑनलाइन’ सुविधेचा अर्ज कसा भरायचा याची कल्याण उपप्रादेशिक परिवहन हद्दीत प्रशिक्षणे घेण्यात येत आहेत. अंबरनाथ भागात असे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला स्थानिक भागातील मोटार प्रशिक्षण केंद्रांचे मालक उपस्थित होते. स्थानिक मोटार चालक प्रशिक्षण केंद्र चालकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे.
या केंद्रातून शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज भरला की तो अर्ज ‘ऑनलाइन’ पद्धतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठवला जातो. ‘ऑनलाइन’ पद्धतीने प्रशिक्षण केंद्रातून पाठवलेल्या अर्जाला तात्काळ शिकाऊ परवान्यासाठी येण्यासाठी तारीख कळवली जाते. त्या दिवशी ‘आरटीओ’ कार्यालयात उपस्थित राहून वाहन मालक, चालकाने ‘आरटीओ’ कार्यालयात घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण झाली की त्याला तात्काळ शिकाऊ परवाना देण्यात येतो, असे राजेश सरक यांनी सांगितले.
ऑनलाइन पद्धतीमुळे नागरिकांना यापुढे शिकाऊ प्रशिक्षणाचा अर्ज घेण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालयात येण्याची गरज नाही. फक्त प्रशिक्षणासाठी आलेला चालक आरटीओतील वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झाला की त्याला शिकाऊचा परवाना देण्यात येतो. या पद्धतीमुळे व्यवस्थेत पारदर्शकपणा आला आहे. दररोज सुमारे १४० नागरिक प्रशिक्षणासाठी येतात. त्यांना शिकाऊ परवाने दिले जातात, असे त्यांनी स्पष्ट केले. विभागवार शिबिरातून माहिती देण्याचे काम अजय मेहेर करीत आहेत.