मायानगरी मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षांत मुंबईत दर दिवशी दोन महिलांवर बलात्कार होतात आणि पाच महिलांचे विनयभंग होतात. तर दर दिवशी दोन महिलांचे अपहरण केले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बलात्काराबरोबर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. चालू वर्षांत (१ जानेवारी २०१५ ते १० मे २०१५) विनयभंगाच्या एकूण ६८५ घटना दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत विनयभंगाचे एकूण ५९५ गुन्हे दाखल झाले होते. म्हणजेच चालू वर्षी दररोज ५ महिलांचा विनयभंग होत असतो. छेडछाडीचे १३३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महिलांचे अपहरण करण्याचे प्रमाणही जास्त आहे. चालू वर्षांत १० मे पर्यंत अपहरणाचे २८८ गुन्हे दाखल झाले. त्यातील १०९ गुन्ह्य़ांची उकल करण्यात आली आहे. त्यात २७८ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. अल्पवयीन मुली बेपत्ता असतील तरी न्यायालयाच्या आदेशामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे अपहरणाची आकडेवारी जास्त आहे.
हुंडय़ाच्या छळाला कंटाळून १५ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. तर हुंडय़ासाठी छळ केल्याबद्दल २२७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याशिवाय चालू वर्षांत १० महिलांच्या हत्या झाल्या आहेत तर ४ प्रकरणांत महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महिलांना बळजबरीने वेश्याव्यवसायास भाग पाडले जाते. चालू वर्षांत ३५ कुंटणखान्यावर कारवाई करून १६४ महिलांची सुटका करण्यात आली तर ६८ जणांना अटक करण्यात आली.
महिलांचा मुंबई पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे त्या आपल्यावरील अन्यायाविरोधात तक्रारी पुढे देण्यास येत आहेत. गुन्ह्य़ांचे आकडे वाढले तरी महिलांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. पूर्वी विनयभंगाच्या तक्रारी फारशा केल्या जात नसत. नंतर त्यातून गंभीर गुन्हे घडायचे. मुंबई पोलीस महिलांच्या गुन्ह्य़ाचा तत्परतेने तपास करून त्यांना न्याय मिळवून देत आहे.
    मोहन दहिकर, पोलीस उपायुक्त
* मुंबई पोलिसांनी २०१५ या वर्षांतल्या गुन्हेगारींची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१५ ते १० मे २०१५ या पहिल्या चार महिन्यातल्या ताज्या आकडेवारीचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार महिलांवरील बलात्काराचे २५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात १५२ अल्पवयीन मुलींचा तर १०६ महिला आणि तरुणींचा समावेश आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण २२३ एवढे होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्वरित या प्रकरणाचा तपास केला जात असल्याने गुन्ह्य़ाची उकल होण्याचे प्रमाण चांगले आहे. या दाखल गुन्ह्य़ातील ८६ टक्के गुन्ह्य़ांचा तपास पूर्ण करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
महिलांवरील अत्याचार
१ जानेवारी २०१५ ते १० मे २०१५

* बलात्कार- २५८ (अल्पवयीन- १५२, सज्ञान- १०६)
* विनयभंग- ६८५
* अपहरण – २८८ (अल्पवयीन २७८, सज्ञान १०)
* हत्या- १०
* हुंडय़ाच्या त्रासाने आत्महत्या- १५
* हुंडय़ासाठी हत्या- ३
* हुंडय़ासाठी छळ- २२७
(स्रोत- मुंबई पोलिसांची अधिकृत आकडेवारी)