मुंबई-ठाण्यालगत असूनही अतिशय स्वस्त किमतीत मिळालेले घर प्रत्यक्षात किती महाग ठरते, याचा अनुभव अतिवृष्टीच्या काळात दिवावासीय नेहमीच घेत असतात. जुलै २००५च्या प्रलयंकारी अतिवृष्टीत सलग दोन दिवस दिव्यातील बहुतेक चाळी पाण्याखाली होत्या. मात्र त्या भयंकर अनुभवापासून कोणताही धडा न घेता जंक्शन रेल्वेस्थानक असलेले दिवा अस्ताव्यस्तपणे वाढतच चालले आहे. खाडीकिनारच्या खारफुटीची बेसुमार कत्तल करून भूमाफियांनी उभारलेल्या या वस्त्यांमधील नागरिकांनी घराचे जोते उंच करून संभाव्य पूर रोखण्याचे उपाय केले असले, तरी अतिवृष्टीच्या काळात ते ओलांडून पाणी घरात शिरते. यंदाही बुधवार-गुरुवारी दिवा पूर्व विभागातील अनेक चाळींमध्ये पाणी शिरले होते. खाडी हटवून टाकलेल्या भरावावर उभारण्यात आलेल्या या चाळींचा पायाच भुसभुशीत असल्याने धोक्याची टांगती तलवार येथील रहिवाशांच्या डोक्यावर कायम असते. अधिकृत घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यानंतर गेल्या दहा-बारा वर्षांत नागरिकांचे लक्ष दिवा गावाकडे वळले. त्यामुळे खाडीकिनारच्या या एकेकाळच्या टुमदार गावास आता अनधिकृत वस्त्यांची बजबजपुरी असणाऱ्या बकाल शहराची अवकळा आली आहे. शिक्षण, बाजारहाटाबरोबरच अगदी पिण्याच्या पाण्यासारख्या अतिशय प्राथमिक गरजांसाठी या वस्त्या शेजारील मुंब्रा, डोंबिवली तसेच ठाणे शहरावर अवलंबून आहेत.
खाडी बुजवा-झोपडय़ा बांधा
दिव्याप्रमाणेच ठाणे आणि कळव्यादरम्यानच्या खाडीत मूळच्या खारफुटींची कत्तल करून उभारण्यात आलेल्या हजारो झोपडय़ा म्हणजे साक्षात मृत्यूचे सापळेच आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवघ्या हजार रुपयांमध्ये येथे कच्च्या स्वरूपाची झोपडी विकत मिळते. गेली अनेक वर्षे ‘खाडी बुजवा-झोपडय़ा बांधा’ धोरण येथील भूमाफिया राबवीत आहेत.   
आहे ‘अधिकृत’ तरीही
सध्या एमएमआरडीए परिसरातील अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या नव्या शहरांमध्येही बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवते. बदलापूर शहर हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना पाणीपुरवठा करणारी उल्हास नदी बदलापूर शहरातून वाहते. अतिवृष्टीच्या काळात नदी दुथडी भरून वाहू लागली की परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरते. पुलावरून पाणी वाहून पलीकडच्या बदलापूर गावाचा संपर्क तुटतो. पात्रापासून दोन्ही बाजूंना ३० मीटर ही नदीची पूररेषा असून शहरात अनेक ठिकाणी तिचे उल्लंघन झाल्याने अतिवृष्टीच्या काळात पश्चिम विभागातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरते.