मेळघाटात गेल्या अनेक वर्षांपासून विजेचा लपंडाव सुरू असताना कायमस्वरूपी तोडगा काढण्यात महावितरण कंपनीला यश आलेले नाही. मेळघाटातील शेकडो गावांमध्ये कमी दाबाच्या वीज पुरवठय़ामुळे व्यवस्थाच मोडकळीस आलेली असताना २५ गावांमध्ये गेल्या बारा वर्षांपासून अंधार कायम आहे.
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खारी, हिल्डा, बोरदा, बिबा, राहू, कारंजखेडा, सिमोरी, चिलाटी, डोमी, हतरू, रेटय़ाखेडा, बोराटय़ाखेडा, खंडूखेडा, भुतरूम, चोबिदा, खुरिदा, आवागड, तसेच धारणी तालुक्यातील धोकडा, रंगूबेली, कुंड, चौपम, कोपमार, चेथर, मारितखेडा, झिरा, पिमखेडा, पुलूमगव्हाण या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काळोखाचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. आंदोलन झाल्यानंतर एक-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत झाला की, पुन्हा अंधार, हे समीकरण होऊन बसले आहे. काही गावांमध्ये तर एका तपापासून वीज पुरवठाच नाही.
अमरावती जिल्ह्य़ात राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची शंभर टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, पण मेळघाटातील अनेक गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नसल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मेळघाटातील १८ गावांचे विद्युतीकरण वनकायद्यातील तरतुदींमुळे होऊ शकत नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. या गावांमध्ये अपारंपारिक पध्दतीने वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडे (मेडा) काही वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आला, पण तोही अडगळीत गेला आहे.
मेळघाटातील धारणी येथे अतिउच्च दाब केंद्र, १३२ के.व्ही. उपकेंद्राचे काम कासवगतीने सुरू आहे. जारिदा येथे ११ के.व्ही. स्विचिंग उपकेंद्र प्रस्तावित आहे.
याशिवाय, मेळघाटात योग्य दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या खऱ्या, पण त्यातून अजूनपर्यंत मेळघाटातील आदिवासींना दिलासा मिळालेला नाही.
हतरू या अकराशे लोकवस्तीच्या गावात १९८४ मध्ये विजेचे खांब उभारण्यात आले.
लोकांनी आनंद व्यक्त केला, पण त्यांचा हा आनंद ४८ तासही टिकू शकला नाही. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आगमनानिमित्त एक दिवस वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर वीज आली, पण तीही चोवीस तासापेक्षा जास्त टिकू शकली नाही. विजेचा लपंडाव असाच सुरू आहे.
मेळघाटातील पन्नासवर गावांमध्ये अशीच स्थिती आहे. अनेक गावांमध्ये कमी दाबांच्या वीज पुरवठय़ामुळे शेतीचे सिंचन करणेही अशक्य होऊन बसले आहे. दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे.