विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महापौरपदासाठी नागपूर विकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ सदस्यांनी प्रयत्न सुरू केले असले तरी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, दटके मध्य नागपूर विधानसभा मतदार संघाचे प्रमुख दावेदार आहेत. शिवाय महापौर होण्यास त्यांची फारशी इच्छा नसली तरी वाडय़ावरून नाव निश्चित झाल्यामुळे दटके यांच्यासमोर कुठलाही पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

महापौर अनिल सोले यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड विशेष सभेत येत्या ५ सप्टेंबरला होणार असून तशी अधिसूचना विभागीय आयुक्तांनी जाहीर केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. सोमवारी नामनिर्देश पत्र स्वीकारले जाणार असून ५ सप्टेंबरला सभेच्या दिवशी छाननी होऊन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल.
दोन्ही पदासाठी एकाशिवाय जास्त अर्ज आले तर मतदान घेण्यात येईल, अन्यथा आवश्यक नसल्यास महापौरांच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
आरक्षण सोडतीमध्ये महापौरपद ओबीसीसाठी खुले ठेवण्यात आल्यामुळे दावेदारांमध्ये प्रवीण दटके यांच्याशिवाय अविनाश ठाकरे, रमेश सिंगारे, सुधाकर कोहळे, छोटू भोयर, नीता ठाकरे यांचा समावेश आहे. अविनाश ठाकरे गेल्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून काम करून घेण्याचा अनुभव आहे. या शिवाय रमेश सिंगारे समितीच्या अध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र, त्यांच्या जागी बाल्या बोरकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे सिंगारे आणि दक्षिण नागपूर मतदारसंघातील सुधाकर कोहळे प्रमुख दावेदार आहेत. छोटू भोयर यांची नागपूर सुधार प्रन्यासवर वर्णी लावण्यात आल्यामुळे तसेही त्याचे नाव महापौरदासाठी नाही. शिवाय भोयर विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मध्य नागपूरमधून प्रवीण दटके दावेदार असून अनेक भाजपमधील एका गटाची तशी इच्छा आहे. तर दुसरीकडे विकास कुंभारे यांना उमेदवारी दिली नाही तर हलबा आणि मुस्लिम समाज नाराज होण्याची शक्यता आहे. मध्य नागपुरात हलबा आणि मुस्लिम मतदारांची संख्या ही ६० टक्के आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी कुठलाही धोका न पत्करता महापौरांची माळ दटकेंच्या गळ्यात टाकण्याच्या तयारीत आहेत. वाडय़ावरून त्यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे वाडय़ाचा हा निर्णय अंतिम असल्यामुळे दटके यांच्यासमोर पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. प्रवीण दटके यांनी तीनवेळा महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.  महापालिका प्रशासनाकडून काम करून घेण्याचा त्यांना अनुभव आहे. दटके यांच्याकडे सध्या सत्तापक्ष म्हणून जबाबदारी आहे. महापौर म्हणून त्यांची निवड झाली तर सत्तापक्ष म्हणून संदीप जोशी यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. उपमहापौर जैनुतनबी पटेल यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरला महापौरांसोबतच उपमहापौरांची निवड केली जाणार आहे.
नियमानुसार उपमहापौरपद अडीच वर्षांचे असले तरी सत्तापक्षाने आपल्या सोयीसाठी प्रत्येकी सव्वा वर्षांचे करून पाच वर्षांत चौघांकडे ती जबाबदारी देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे प्रारंभी दलित चेहरा म्हणून संदीप जाधव आणि त्यानंतर मुस्लिम चेहरा म्हणून जैतुनबी पटेल यांना उपमहापौरपद दिले. यावेळी उपमहापौरकडे आघाडीमध्ये सहभागी असलेल्या अपक्षांना दिले जाण्याची शक्यता असून त्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक मुन्ना पोकुलवार यांचे नाव आघाडीवर आहे.
पोकुलवार यांनी लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना बरीच मदत केली आहे त्यामुळे त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागण्याची जास्त शत्यता असल्याचे बोलले जात आहे.