राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, दाभोलकर व अॅड. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आलेले अपयश आदींचा निषेध करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली तर कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आंदोलन करण्यात आले. या शिवाय, आळंदी सहकारी उपसा जलसिंचन संस्थेच्या कर्जमाफी मिळावी यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी व किसान सभेने आमरण उपोषण केले. यामुळे सोमवार हा  जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आंदोलनाचा दिवस ठरला.
भाकपने आयटकचे राज्य कार्याध्यक्ष अॅड. पानसरे व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्यांना अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचे आयोजन केले होते. मारेकऱ्यास त्वरीत अटक न झाल्यास ११ मार्च रोजी मुंबई येथे निषेध निर्धार मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा सचिव राजू देसले, दत्तु तुपे यांनी दिला. राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील तळवाडे या गावी ग्रामपंचायतीने ठराव देऊनही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाचे अनावरणास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. प्रशासनाने ती परवानगी द्यावी ही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांना शासन करावे, पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराची चौकशी व्हावी व नागरिकांची ससेहोलपट थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या.
याच दिवशी आळंदी सहकारी उपसा जलसिंचन संस्थेच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास सुरुवात केली. उपसा सोसायटीच्या मदतीने एक थेंब पाणी मिळाले नाही. मात्र मिळकतींवर बोजा लागला आहे. यामुळे चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्हा बँकेने संस्थेला दिलेल्याय ७५ लाख रुपये कर्जाची वसुली संस्थेच्या सभासदांनी केली आहे. सातबारावरील बोज्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही, अशी तक्रार अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली.