शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील बाहेर पडणारे रसायनमुक्त पाणी पिल्याने तब्बल ६० ते ७० मेंढय़ांचा मृत्यू झाला तर, २० मेंढय़ा अत्यवस्थ आहेत. सुमारे १५ ते २० लाखापर्यंतचा आर्थिक फटका या मेंढय़ांच्या मालकांना बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीत संजय सोया आणि महाराष्ट्र ऑईल मिल या तेल कंपन्यांमधून रसायनयुक्त सांडपाणी नाल्यांमध्ये सोडले जाते.
बुधवारी दुपारच्या सुमारास अवधान येथील राजाराम पाटील यांच्या शेतात काही मेंढय़ा बसविण्यात आल्या होत्या. या मेंढय़ांनी रसायनयुक्त पाणी पिल्याचे सांगितले जाते. सायंकाळनंतर एकेक मेंढी तडफडून मरू लागली. शेलारवाडीचे पंडित मानकू वाघमोडे, नारायण माधव थोरात आणि अवधानचे रमेश रामा सरगर यांच्या या सर्व मेंढय़ा आहेत. रात्रीतून त्यांच्या वाडय़ामधील सुमारे ७० मेंढय़ांचा मृत्यू झाला. तर, २० मेंढय़ांची स्थिती चिंताजनक आहे. मेंढय़ांना त्रास होऊ लागल्याचे जाणवताच मेंढय़ांच्या मालकांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधला आणि मदतीची विनवणी केली. परंतु रात्री केवळ त्यांचे सहाय्यक येऊन गेले. पाहणी करून ते निघून गेले.
पोलिसांनाही माहिती दिली गेली. परंतु गुरूवारी दुपापर्यंत कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतली गेली नसल्याची तक्रार वाघमोडे, सरगर यांनी केली आहे. संजय सोया आणि महाराष्ट्र ऑईल मिल मधून बाहेर पडणारे रसायनयुक्त पाणी पिण्यात आल्यानेच आपल्या मेंढय़ांचा प्राण गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. थोरात यांचा १० हजार रूपये किंमतीचा मेंढाही या घटनेत मृत्यूमुखी पडला.