विद्युतवाहिनीच्या संर्पकात आल्याने शेतावर काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलमधील चिंचवली गावात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. झुकलेल्या विद्युत खांबामुळे सहज संपर्कात येणाऱ्या विद्युतवाहिन्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सरकारी अनास्थेमुळे या महिलेचा नाहक बळी गेल्याची संतापजनक भावना चिंचवली ग्रामस्थांनी व्यक्त केली.   
मनुबाई ठोंबरे असे या मृत महिलेचे नाव आहे. शेतामध्ये मनुबाई या डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा घेऊन जात असताना त्या विद्युतवाहिनीच्या संपर्कात आल्या. त्यांच्या कुटुंबीयांना काही समजण्याअगोदरच मनुबाईंचे शरीर काळे पडले होते. ग्रामस्थांनी परिसरात विजेचे पोल जीर्ण झाल्यामुळे विजेच्या तारा जमिनीपासून काही अंतरावर झुकल्याची तक्रार वेळोवेळी महावितरण कंपनीच्या तळोजा येथील कार्यालयात केल्याची माहिती या परिसरातील पंचायत समिती अध्यक्ष सचिन काणे यांनी दिली. याबाबत वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता दिलीप मेहेत्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ही गंभीर घटना आहे. या परिसरातील कनिष्ठ अभियंता फुंड यांना घटनास्थळी माहिती घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे.