मुंबई, ठाणे परिसरातील धोकादायक इमारतींची जटील समस्या नव्याने ऐरणीवर आली आहे. डोंबिवलीत ठाकुर्ली येथील चोळेगावातील मातृकृपा ही धोकादायक इमारत मंगळवारी रात्री कोसळून नऊ जणांचा बळी गेल्यानंतर डॉकयार्ड रोड व मुंब्रा येथे झालेल्या इमारत दुर्घटनांच्या आठवणी जाग्या झाल्या. मात्र यापूर्वी घडलेल्या अशा दूर्घटनांतून संबंधितांनी काहीच बोध न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतही अशा अनेक जीर्ण चाळी, इमारती असून अशा अपघातांत मालक आणि भाडेकरुंमधील संघर्षांची किनार जीवघेणी ठरत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६८६ धोकादायक, अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारती तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्याअसल्याने त्यांची बांधकामेही जुन्या पद्धतीची आहेत. ही बांधकामे लोड बेअरिंग अथवा आरसीसी पद्धतीची नसल्याने काळाच्या ओघात या इमारती धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील भाडेकरु वर्षोनुवर्षे दहा ते पन्नास रुपये इतक्या नाममात्र भाडय़ात वास्तव्य करुन आहेत. इमारत मालक भाडे वाढवून मागतात, मात्र भाडेकरू ते देण्यास तयार नाहीत. जमिनींचे भाव वाढल्याने इमारतींच्या पुनर्विकासाचा विचार हे मालक करीत असताना भाडेकरू मालकाला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते. परिणामी, या इमारतींची बहुतांश प्रकरणे न्यायालयीन खटल्यात अडकली आहेत. या वादामुळे मालकाकडून या इमारतींची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. भाडेकरूंनी दुरुस्ती, देखभाल करण्याचा प्रयत्न केला तर मालक ती करू देत नाही. या वादात शेकडो कुटुंबांचे आयुष्य टांगणीला लागले आहे. कमीत कमी मोबदला देऊन मालक या भाडेकरूंना इमारत सोडून जाण्यासाठी सांगत आहेत. त्याला भाडेकरू तयार नाहीत. दामदुप्पट मोबदला, सदनिकेवरील हक्क कायम करणे अशा मागण्या भाडेकरू करीत असल्याचे मालकांचे म्हणणे आहे.
मुंबईतही कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असून मालक व भाडेकरूंचा हा संघर्ष भावी संकटांना आमंत्रणच देत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ३९५ धोकादायक तर २९१ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींच्या मालकांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा नियमितपणे देण्यात येतात. त्यानंतर मात्र इमारत रिकामी करावी यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. दरवर्षीचा हा परिपाठ असल्याने मालक नोटिसा घेऊन त्या केराच्या टोपलीत भिरकावून देतात. तसेच, अशा इमारतींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने पालिका या इमारतींवर कारवाई करताना हात आखडता घेते. इमारतीचे छत, सज्जा कोसळला की मग मात्र पालिका अधिकारी इमारत पाडण्यासाठी सरसावतात.
कल्याण-डोंबिवली महापालिकेने दोन वर्षांपूर्वी काही अभियंत्यांची धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी नेमणूक केली होती. धोकादायक इमारतींची पाहणी करून या अभियंत्यांनी अहवाल दिले की पालिकेमार्फत संबंधित इमारत मालक आणि राहणाऱ्या कुटुंबांना डागडुजी करण्याचे आदेश देण्यात येत असत. या अभियंत्यांचे मानधन वेळेवर देण्यात महापालिका टाळाटाळ करू लागली. काही अभियंत्यांनी संरचनात्मक परीक्षण करण्याची कामे बंद केली. त्यामुळे पालिकेने इमारत मालक, सदस्यांना आपण आपल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या, अशा नोटिसा पाठवल्या.
कागदपत्रे, दागिने शोधण्यासाठी धडपड
ठाकुर्ली येथील चोळेगावातील दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याने आपली महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यासाठी काही नागरिक जिवाचा आटापिटा करत होते. सकाळी दहा नंतर बाजूला काढण्यात आलेल्या ढिगाऱ्यात आपली कागदपत्रे, दागिने शोधण्यासाठी काही नागरिकांना सोडण्यात आले. यावेळी मोडतोड झालेल्या घराचे ढिगारे पाहून अनेकांचा बांध फुटत होता.

डॉक्टरांचेही
मोलाचे सहकार्य
महापालिका डॉक्टरांच्या पथकाने दुर्घटनेनंतर घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर प्राथमिक उपचार करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने अनेक जखमी नागरिक आपल्या नातेवाईकांची चौकशी परिचारिका तसेच डॉक्टरांकडे करत होते. डॉक्टरांनी या जखमींना मानसिक आधार देण्याचे कामही केले. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे या घटनास्थळी रात्रीपासून दाखल होत्या.

गणपती बप्पा मोरया
बृहमुंबई अग्निशमन दल, तसेच नवी मुंबई येथील रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स दाखल झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जिवंत व्यक्तीचा प्रतिसाद मिळताच नागरिक त्यांना स्फुरण देण्यासाठी गणपती बप्पा मोरया असे बोलून त्यांची हिंमत वाढवित होते. पावसाचा अडथळा मध्ये जाणवत असला तरी बचावकार्य थांबविण्यात आले नाही. पहाटे पाचपर्यंत दहा जखमींना सुखरुप बाहेर काढण्यात आले.