‘साहेब, मी तुमच्या बँकेचा मॅनेजर बोलतो आहे. तुमचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. तुम्हाला ते चालू ठेवायचे असेल, तर आपला कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक, आदी माहिती आम्हाला द्या.’ असा कॉल करून मध्य रेल्वेच्या एक नाही, तर सात मोटरमनच्या बँक खात्यातून सुमारे सव्वालाख रुपये काढण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या सुमारे ३०० मोटरमनपैकी शंभराहून अधिक जणांना असा कॉल आला असून
फसगत झालेल्या सात जणांपैकी तिघांनी सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे या सातही जणांचे खाते कल्याणमधील स्टेट बँकेच्या शाखेत होते. मध्य रेल्वेच्या मोटरमनकडे रेल्वेने दिलेल्या सीमकार्डचा एक क्रमांक आहे. या कार्डच्या शेवटच्या चार क्रमांकांमधील ५१०० या क्रमांकाच्या मालिकेतील मोटरमनना रविवारपासून एक कॉल येण्यास सुरुवात झाली. ‘तुमच्या बँकेचा मॅनेजर बोलत आहे’, असे हा दूरध्वनीवर बोलणारा माणूस सांगत होता. त्यावर कोणत्या बँकेचा, असे विचारल्यावर‘ज्यात तुमचे पगाराचे खाते आहे त्या’, असे उत्तर तो देत होता. ‘तुमचे डेबिट कार्ड उद्यापासून बंद होणार आहे. तुम्हाला ते चालू ठेवायचे आहे का,’ अशी विचारणाही तो करत होता. स्वत:चे नाव रोहित शर्मा सांगणाऱ्या या माणसाने एकामागोमाग एक शंभराहून अधिक मोटरमनना कॉल केले. त्यापैकी बहुतेक सर्वानीच हा कॉल कट करून या माणसाला वाटेला लावले. पण काही जणांनी
त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. गणेशोत्सव, त्यानंतर होणार पगार, मुलांच्या शाळेचे शुल्क, इतर खर्च यांचा विचार मनात येऊन या लोकांनी ‘डेबिट कार्ड चालू ठेवायचे आहे’, असे या व्यक्तीला सांगितले. त्यावर या रोहित शर्माने कार्ड नंबर, मागे असलेला सीव्हीव्ही क्रमांक, कार्ड संपण्याची तारीख आदी तपशील विचारून घेतले. ‘तुम्हाला पिन नंबरबाबतचा संदेश येईल, तो पिन नंबर मला सांगा.. आता तुमचा जुना पिन क्रमांक मला सांगा..’ असे बोलण्यात गुंतवत त्याने पिन क्रमांकही काढून घेतला. काही वेळाने या सर्वाच्या खात्यातून बरेच पैसे खर्च झाल्याचे संदेश त्यांच्या मोबाइलवर आले. यात के. पी. सिंग यांचे ४९ हजार, के. एस. यादव यांचे १०,७००, मुदलियार यांचे ३१ हजार आणि एका गार्डचे ४० हजार रुपये त्यांच्या खात्यातून खर्च झाले. यापैकी काहींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना सायबर गुन्हे शाखेत तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आतापर्यंत दोघांनी तक्रार नोंदवल्याची माहिती, मोटरमन प्रवीण कटियार यांनी दिली.या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने इतरांशी संपर्क साधला असता, ‘आम्हाला कॉल करणे बंद कर. पोलीस तुला पकडतील’, असे सांगितल्यावर या रोहित शर्मा नावाच्या व्यक्तीने ‘मला कोणीही पकडू शकत नाही’, असे उत्तर दिल्याचेही कटियार यांनी सांगितले. नेमके रेल्वे कर्मचाऱ्यांनाच कसे कॉल येत आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त करत कटियार यांनी बँक किंवा रेल्वे येथीलच एखाद्या व्यक्तीने ही माहिती पुरवल्याचा संशय व्यक्त केला.