रेल्वे अर्थसंकल्प २०१२-१३ मध्ये मुंबईसाठी जाहीर करण्यात आलेल्या अनेक घोषणांबाबत ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ अशी स्थिती आहे. नवी मुंबईमध्ये रेल्वे कोच कॉम्प्लेक्स, नवी मुंबई टर्मिनल, हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा, जवाहरलाल नेहरू बंदरातील मालवाहतुकीसाठी विशेष मार्ग, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा उपनगरी रेल्वे मार्ग आदी घोषणा मागील रेल्वे अर्थसंकल्पात केल्या गेल्या होत्या. यातील जवळपास काहीच मुंबईकरांच्या पदरात प्रत्यक्षात पडलेले नाही. नवी मुंबईत रेल्वेचे डबे बनविणारा कारखाना सुरू करण्याची आणि रेल्वे टर्मिनल उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. मात्र वर्षभरात त्यासाठी जागा निवडण्याबाबत प्राथमिक चर्चासुद्धा रेल्वे बोर्डाने सिडको आणि राज्य सरकारबरोबर चर्चा केलेली नाही. हार्बर मार्गावर १२ डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत फलाटांची लांबी वाढविणे, जादा डबे उपलब्ध करणे आदी पायाभूत सुविधांची आवश्यकता होती. राज्य शासन आणि ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळ’ यांच्यावर या सुविधांसाठी ५०-५० टक्के खर्चाची जबाबदारी होती. तथापि, राज्य शासनाने याबाबतचा करार करण्यास विलंब लावल्याने हा प्रकल्प तीन महिन्यांनी पुढे ढकलला गेला. सध्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द दरम्यानच्या स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत असून डॉकयार्ड रोड, टिळकनगर, सॅण्डहर्स्ट रोड, रे रोड येथे काम सुरू झाले आहे. तुर्तास १२ ऐवजी १० डब्यांची गाडी सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेचा प्रयत्न सुरू असून मार्च अखेपर्यंत ही गाडी सुरू होईल, असा विश्वास मध्य रेल्वेकडून व्यक्त होत आहे.