मुंबईतील वाहतूक कोंडीतून मार्ग काढत अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयापर्यंत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना आता मोकळा मार्ग देण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवा उपक्रम सुरू केला आहे. ‘राधी फाउंडेशन’ या संस्थेसह बेस्ट ‘रुग्णवाहिकांसाठी मोकळा मार्ग’ हा कार्यक्रम राबवणार असून त्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत बेस्टच्या चालकांना रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासंबंधीच्या सूचना देण्यापासूनच याबाबत जागरूकता करणारे फलक बेस्टच्या गाडय़ांवर लावले जाणार आहेत.
परदेशांमध्ये रुग्णवाहिकांचा भोंगा ऐकू आला की रस्त्यावरील सर्व गाडय़ा रस्त्याच्या डाव्या बाजूला जातात. त्यामुळे उजवी माíगका रुग्णवाहिकेसाठी मोकळी राहते आणि अत्यवस्थ रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचवणे शक्य होते. अपघातात जखमी झालेल्या किंवा इतर कोणत्याही रुग्णासाठी पहिला तास ‘गोल्डन अवर’ मानतात. या पहिल्या तासात त्याच्यावर उपचार झाल्यास त्याची आजारातून वाचण्याची शक्यता जास्त असते. मात्र मुंबईच्या प्रचंड वाहतूक कोंडीत पुढे सरकायला जागा न मिळाल्याने अनेकदा रुग्णवाहिकांचा मार्ग खुंटतो. परिणामी, वेळेत उपचार न झाल्याने दगावणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.
ही समस्या लक्षात घेत राधी फाउंडेशन आणि वाहतूक पोलीस यांनी एकत्र येत ‘रुग्णवाहिकांसाठी मोकळा मार्ग’ ही संकल्पना सुरू केली. या संकल्पनेत आता बेस्ट उपक्रमही सहभागी झाला आहे. बेस्टच्या बसगाडय़ांच्या चालकांना आता रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगारातील चालकाला या सूचना देण्यात आल्या असून आता रुग्णवाहिकांचा भोंगा ऐकू आला की बेस्टचे चालक आपली बस शक्य तेवढय़ा लवकर रस्त्याच्या डाव्या बाजूला नेऊन रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देतील, असे बेस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी स्पष्ट केले.
याच उपक्रमाचा भाग म्हणून बेस्ट चालकांच्या प्रशिक्षण वर्गातही चालकांना रुग्णवाहिकेचा भोंगा ऐकल्यानंतर काय करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रुग्णवाहिकेत रुग्ण असल्यास, रुग्णवाहिका रुग्णाला आणायला जात असल्यास किंवा इंधन भरायला जात असल्यास भोंगा वाजवला जातो. हा भोंगा वाजला की चालकांनी आपली गाडी डाव्या बाजूला घ्यावी, असे प्रशिक्षण चालकांना दिले जाणार आहे. तसेच बेस्टच्या बसगाडय़ांवर याबाबतची पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. बेस्टच्या गाडय़ांवरील जाहिरातींना आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या पोस्टरवरील रुग्णवाहिकांना मार्ग देण्याबाबतचा संदेशही लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचेल, असा विश्वास गोफणे यांनी व्यक्त केला.