जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून अपहरण करण्यात आलेल्या मुलाने नाशिक येथे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यश मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाचोऱ्याजवळील नांद्रा येथील संजय पाटील यांना दीप (१३) आणि दर्शन ही दोन जुळी मुले आहेत. दोघे पाचवीपासून पाचोरा येथील विद्यालयात शिक्षण घेतात. ९ डिसेंबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास दोघे भाऊ पाचोरा बस स्थानकात उतरून क्लाससाठी जात असताना शिवाजीनगर भागातील प्रार्थनास्थळाजवळ त्यांच्या अंगावर कुत्रा धावून आला. घाबरून दर्शन पुढे पळाला व दीप मागे राहिला. थोडय़ा वेळाने दीप आपल्याबरोबर नसल्याचे दर्शनच्या लक्षात आले. दर्शनने शोधाशोध केली, पण कुठेही त्याला आपला भाऊ दिसला नाही. त्याने वडील संजय पाटील यांना भ्रमणध्वनीवरून झालेला प्रकार सांगितला. संजय पाटील यांनीही शोधाशोध सुरू केली, परंतु दीप दिसून आला नाही. काही वेळाने नाशिकरोड स्टेशनच्या पार्सल ऑफिसमधून त्यांना मुलगा सुखरूप असल्याचा फोन आला. तो घाबरलेल्या अवस्थेत असून त्याने तुमचा फोन नंबर देऊन संपर्क करायला सांगितले, असे समोरील व्यक्तीने त्यांना कळविले. पाटील यांनी त्वरित नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांना झालेल्या घटनेविषयी माहिती देऊन दीपला ताब्यात घेण्याची विनंती केली.
त्यानंतर पाटील यांनी नाशिकहून दीपला घेऊन पाचोरा गाठले. दीपने झालेल्या प्रकाराविषयी माहिती दिली. पाचोऱ्यातील शिवाजीनगर भागातून काही जणांनी दीपला उचलले. शुद्ध आल्यावर त्यास आपण नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ असल्याचे त्यास दिसून आले.
मारुती ८०० निळ्या रंगाच्या गाडीतून दोन जणांनी आपणास पळवून आणल्याचे त्याच्या लक्षात आले. नाशिकरोड येथे दोघे अपहरणकर्ते चहा पिण्यासाठी गाडीतून उतरल्याची संधी साधत दीपने गाडीतून पलायन केले.
जवळच असलेल्या पार्सल ऑफिसमध्ये त्याने धाव घेतली. तेथील कर्मचाऱ्यांनी विचारपूस करून त्याला धीर दिला. कर्मचाऱ्यांनी दीपकडून त्याच्या वडिलांचा फोन नंबर घेऊन तो सुखरूप असल्याचे कळविले. पाचोरा पोलीस ठाणे गाठून पाटील यांनी झालेल्या घटनेविषयी माहिती दिली.