बॉलीवूडमधील तीन खानांच्याबरोबरीने कोणी काही केले की सहजच त्याला ‘खान’ नाव दिले जाते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जेव्हा विद्या बालनने ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहानी’सारख्या वेगळ्या चित्रपटांमधून नायिका म्हणून आपले अस्तित्व सिद्ध केले तेव्हा तिला बॉलीवूडची नवीन ‘खान’ असे संबोधले गेले. आत्तापर्यंत नायकप्रधान असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून आपली वेगळी जागा निर्माण क रणे हे आव्हान विद्याने पहिल्यांदा पेलले. तिच्यासाठी खास भूमिका लिहिल्या गेल्या, पण तिच्यामागोमाग येऊन ‘कॉकटेल’, ‘रेस’, ‘यह जवानी है दिवानी’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ असे एकापाठोपाठ एक व्यावसायिक हिट चित्रपट देणाऱ्या दीपिका पदुकोणने बॉलीवूडची सगळीच गणितं बदलून टाकलीत. त्यामुळे माध्यमांनी पुन्हा एकदा तिची नवीन ‘खान’ अशी वाहवा सुरू केली असली, तरी बॉलीवूडमध्ये मात्र तिची नवीन ‘ड्रीम गर्ल’ म्हणून गणना होऊ लागली आहे. ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाने शंभर कोटींचा आकडा पार केला, पाठोपाठ ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने दोनशे कोटी पार केले. आणि मग सगळ्यात यशस्वी अभिनेत्री म्हणून दीपिकावर शिक्कामोर्तब झाले. पण संजय लीला भन्साळींच्या ‘राम-लीला’ने तर तिच्या कारकिर्दीत जादूच केली आहे. एरव्ही ‘द संजय लीला भन्साळी फिल्म’  म्हणून त्यांच्या चित्रपटांची ओळख दिली जाते. त्यात दीपिकाबरोबर रणवीर सिंग नायक म्हणून मुख्य भूमिकेत असूनही सगळीकडे दीपिका पदुकोण अभिनीत ‘राम-लीला’ असाच या चित्रपटाचा उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपट वितरकांच्या मते ‘राम-लीला’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी सगळ्यात जास्त कमाई करता आली याचे श्रेय फक्त दीपिकालाच आहे. ‘मल्टिमीडिया कम्बाईन्स’च्या राजेश थडानी यांच्या मते दीपिकाला बॉक्सऑफिसवर सातत्याने जे यश मिळाले तेच राम-लीलासाठी प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे ठरले आहे. तर ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनीही दीपिकाच्या सलग आलेल्या चित्रपटांना जे यश मिळाले आहे त्यामुळे ती बॉलीवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे, असे म्हटले आहे. त्याहीपुढे जात दीपिकाची गणना ही आता बॉलीवूडच्या नायकांमध्येच केली जाणार आहे, असेही तरन आदर्श यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्यावर्षी आलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटाने ७४ कोटींची कमाई केली होती, त्यानंतर ‘रेस २’ चित्रपटाने ९६.४ कोटींची कमाई केली. पण रणबीरबरोबर एकत्र आलेल्या ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटात रणबीरपेक्षाही दीपिकाचे जास्त कौतुक झाले. या चित्रपटाने १८५ कोटींची कमाई केली. त्यानंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुख असूनही मीनाम्माची जास्त चर्चा झाली. यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘यह जवानी है दिवानी’ पाचवा तर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि उरलीसुरली कसर ‘राम-लीला’ने आठवडय़ाभरात ११७ कोटींची कमाई करून भरून टाकली आहे. तद्दन व्यावसायिक चित्रपटात नायकाच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिलेल्या नायिकांसाठी दीपिकाने वेगळाच पायंडा पाडला आहे.
आलेख
*कॉकटेल (२०१२)
    ७४ कोटी
*रेस २ (२०१३ )
    ९६.४ कोटी
*यह जवानी है दिवानी (२०१३)
    १८५.८५ कोटी
*चेन्नई एक्स्प्रेस (२०१३)
    २१८.१५
*राम-लीला  (२०१३)
    ११७ कोटी  

‘राम-लीला’च्या यशामुळे आनंद झाला आहे. व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करतानाही नायिका म्हणून तुम्हाला नायकाइतकेच यश मिळवणे हे मला फार महत्त्वाचे वाटते. ‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटापासूनच मी तो प्रयत्न केला होता. अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवण्यासाठी नायिकाप्रधानच चित्रपट हवेत, ही गरज मला तेव्हाही कधी वाटली नव्हती. उलट आता व्यावसायिक चित्रपटांमधून मला मिळालेले यशच अभिनेत्री म्हणून सुखावणारे आहे.
दीपिका

एक अभिनेत्री म्हणून आपल्या व्यावसायिक चित्रपटांनी शंभर कोटी, दोनशे कोटी किंवा त्याहीपेक्षा जास्त कमाई करणे ही आजची आमची गरजच बनली आहे. माझ्यासाठी कोणी तरी वेगळा चित्रपट लिहील या अपेक्षेने वाट बघण्यात काहीच हशील नाही. तुमच्याकडे येणाऱ्या चित्रपटांची निवड करून त्यात नायिका म्हणून तुम्ही खऱ्या उतरलात तरच इथे तुमचे कौतुक होईल. 
सोनाक्षी सिन्हा