पुणे विद्यापीठ आणि निकालातील गोंधळ हे समीकरण दृढ होत चालले असून ‘मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होऊन सुमारे तीन आठवडे उलटले असले तरी त्याचे गुणपत्रक विद्यापीठ अद्याप देऊ शकलेले नाही. परिणामी, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी गुणपत्रक सादर करणेही अवघड बनले आहे. निकालात निरंतर घोळ घालणाऱ्या विद्यापीठाने एमबीएच्या विद्यार्थ्यांना किमान ऑनलाइन गुणपत्रक देऊन तात्पुरता तोडगा काढावा, अशी मागणी सोमवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राकडे केली. अनेक अभ्यासक्रमांच्या निकालात घोळ घालणाऱ्या विद्यापीठाने ज्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला, त्यांचे गुणपत्रक देण्यासही चालढकल चालविल्याचे या प्रकाराने अधोरेखित झाले आहे.
एमबीए अभ्यासक्रमाची द्वितीय वर्षांतील शेवटच्या ‘सेमिस्टर’ची परीक्षा एप्रिल महिन्यात झाली. या परीक्षेचा ऑनलाइन निकाल ५ जुलै रोजी जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत गुणपत्रक हाती पडणे अपेक्षित होते, परंतु तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही विद्यापीठ संबंधित महाविद्यालयांना गुणपत्रक देऊ शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी अभियांत्रिकीच्या निकालात विद्यापीठाने घोळ घातल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर एमबीए अभ्यासक्रमाच्या निकालाचा हा वेगळाच गोंधळ पुढे आला. गुणपत्रक हाती नसल्याने विद्यार्थ्यांना नोकरीचा शोध घेणे अवघड झाले आहे. शैक्षणिक पात्रता सांगताना त्यांनी अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे संबंधितांना रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश गाढे यांनी पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्र समन्वयांसमोर मांडली. जोपर्यंत मूळ गुणपत्रिका दिली जात नाही, तोपर्यंत ऑनलाइन गुणपत्रिका ग्राह्य धराव्यात, त्याबाबतचे निवेदन विद्यापीठाने जाहीर करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यानिमित्ताने पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून निकाल उशिराने लागणे, गुणपत्रक लवकर हाती न पडणे, एखाद्या विषयात बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण असणे, असे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यावर वारंवार आंदोलने होऊन आवाज उठविला जात असला तरी विद्यापीठाच्या कारभारात मात्र फरक पडलेला नाही, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.