पावसाळा तब्बल महिनाभराने सुरू  झाला आणि एरवी या वेळेत गजबजणाऱ्या फुलपाखरांचे आगमनही लांबले. नागपूरच्या जैववैविध्यात भर घालणाऱ्या या रंगीबिरंगी फुलपाखरांची आस फुलपाखरू अभ्यासक बाळगून असतानाच, ऑगस्टच्या अखेरीस ते दिसून येतील, असा अंदाज फुलपाखरांचे अभ्यासक व इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन)चे डॉ. आशिष टिपले यांनी व्यक्त केला.
पावसाळा म्हटला की रंगीबिरंगी आणि विविध प्रजातीच्या फुलपाखरांची आरास नागपूर आणि आसपासच्या परिसरात अनुभवायला मिळते. अंबाझरी आणि सेमिनरी हिल्स या परिसरात जेवढय़ा पक्षीप्रजाती आढळून येतात, तेवढय़ाच फुलपाखरांच्या प्रजातीसुद्धा येथे बघायला मिळतात. नागपूर शहर आणि परिसरात तब्बल १४७ फुलपाखरांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. फुलपाखरांसाठी तापमान आणि आद्र्रता या दोन्ही बाबी आवश्यक आहेत. एरवी जुन-जुलैमध्ये फुलपाखरांच्या प्रजाती दिसायला लागतात, पण यावर्षी त्या ऑगस्टच्या अखेरीस दिसून येतील. पाऊस पडून गेल्यानंतर आता त्यांना हवे ते वातावरण मिळाले आहे. खूप आधी ते झाडांच्या पानाच्या मागच्या बाजूला अंडी घालून सोडून देतात. आता त्यांना वातावरण मिळाल्यामुळे त्यातून अळया बाहेर पडतील आणि दोन-ते तीन आठवडय़ानंतर त्यातून अंडी बाहेर पडतील, असे डॉ. टिपले म्हणाले.
फुलपाखरू पावसाच्या काही महिने आधीपासूनच अंडी घालून सोडून देतात. त्यांना आवश्यक वातावरण मिळाल्यानंतर त्यातून अळया बाहेर पडतात. बरेचदा त्यांना आद्र्रता मिळाली नाही तर कोशातच त्या राहतात. यावेळी पाऊस लांबल्यामुळे नेमकी हीच परिस्थिती उद्भवली आहे. अंडय़ांमधून अळया बाहेर पडण्यापासून तर त्यांचे फुलपाखरात रूपांतर होण्यापर्यंतचा कालावधी हा सुमारे २५ दिवसांचा असतो, असे डॉ. टिपले म्हणाले. या सर्व फुलपाखरांच्या प्रजातीच्या प्रजननाचा कालावधी तब्बल एक महिना उशिरा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरात त्यांचे आगमन लांबले असले तरीही अमरावती जिल्ह्यात मात्र फुलपाखरे दिसायला सुरुवात झाली आहे. मेळघाट, पोहरा, धारणी, चिखलदऱ्यासह अनेक ठिकाणी फुलपाखरांच्या १३५ प्रजातींची नोंद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. गणेश वानखेडे यांनी केली आहे.