प्रवास आणि पर्यटनविषयक सर्व अद्ययावत माहिती, नकाशे संगणक, इंटरनेट आणि भ्रमणध्वनीच्या जमान्यात सहज उपलब्ध असले तरीही याविषयावरील पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही. पुस्तक विक्रीची दुकाने आणि ग्रंथप्रदर्शनामधून प्रवास आणि पर्यटनविषयक पुस्तकांना आजही मागणी आहे.  
अनेक कुटुंबे किंवा मित्रांचे समूह हे स्वतंत्रपणे, संगणक, इंटरनेट यावरून विविध ठिकाणांची माहिती घेऊन आपल्या सहलीचे नियोजन करत असतात. असे नियोजन केले गेले तरी मराठीत प्रकाशित झालेली प्रवासवर्णन आणि पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या विविध पुस्तकांना चांगली मागणी असल्याचे काही पुस्तक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  
या संदर्भात मॅजेस्टिक बुक एजन्सीचे अनिल कोठावळे यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, सर्वसामान्य माणसांना या पुस्तकांचा, त्यातील माहितीचा खूप उपयोग होतो. विदर्भातील पर्यटकांना कोकणात फिरायचे असेल तर कोकण पर्यटनावर प्रकाशित झालेल्या विविध पुस्तकांतून त्याला माहिती मिळू शकते. पुस्तक प्रदर्शने आणि पुस्तक विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये सध्या प्रवासवर्णन आणि पर्यटनाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. या पुस्तकांना यापुढेही मागणी असणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व युवकांकडून गड-किल्ले, गिरीभ्रमण विषयक पुस्तके जास्त प्रमाणात वाचली जातात.मुंबईत आपण बरेचवेळा परदेशी पर्यटक हातात पुस्तक घेऊन फिरताना पाहतो. ही लोक कधीही कोणाला पत्ता विचारताना दिसत नाही. त्यांच्याकडील पुस्तकात सर्व माहिती अद्ययावत असते. दूरध्वनी क्रमांक, नकाशे आणि अन्य बारिक-सारिक बाबी त्यात असतात. ही पुस्तके इंग्रजीत असतात. मराठीतही एखाद्या ठिकाणाची अद्ययावत माहिती असलेली पुस्तके मोठय़ा प्रमाणात यायला पाहिजेत, अशी अपेक्षाही कोठावळे यांनी व्यक्त केली.  मराठीत दरवर्षी सुमारे एक- दीड ते दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. त्यात प्रवासवर्णन आणि पर्यटनविषयक माहितीच्या पुस्तकांची संख्याअवघी शंभर ते सव्वाशे इतकी आहे. यातही वाढ झाली पाहिजे, असेही कोठावळे म्हणाले.