ख्रिसमस म्हटले की डोळ्यांसमोर वेगवेगळय़ा चवींचे केक आणि सांताक्लॉजबाबाच्या पोतडीतील भेटवस्तू डोळ्यांसमोर येतात. गेल्या काही काळात केक खाण्यासाठी अशा सणाची म्हणून वाट पाहण्याची गरज उरलेली नाही. छोटे-मोठे सोहळे, आयुष्यातील आनंदाचे प्रसंग यासाठी केक आणण्याची प्रथाच तरुणाईने पाडली आहे. मात्र केकमध्ये अंडी टाकली जात असल्याने अनेकदा शुद्ध शाकाहारींची कुचंबणा होते. अंडी न टाकलेला शाकाहारी केक तुलनेत कमी मिळत असल्याने अनेकदा त्यांना इतरांच्या तोंडाकडे बघत बसावे लागते. पण आता मुंबईत हे चित्र पालटत असून शाकाहारी केकची मागणी चांगलीच वाढली आहे. अनेक ठिकाणी तर निव्वळ शाकाहारी केक विकणारी दुकाने सुरू झाली आहेत.
आपल्याकडे हल्ली सणांना, छोटय़ा कार्यक्रमांच्या वेळीसुद्धा केक खाण्यास लोक पसंती देत आहेत. सणांच्या दिवशी कित्येक घरांमध्ये मांसाहार खाणे वज्र्य असते, तसेच बऱ्याच जणांना अंडय़ाची अ‍ॅलर्जी असते. अशा वेळी लोक ‘व्हेज केक’ खाण्यास पसंती देत असल्याचे घरच्या घरी केक बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या ठाण्याच्या अनुश्री कुलकर्णी हिने सांगितले. सध्या शाकाहारी केकमध्ये बटरस्कॉच, चॉकलेट, फ्रेश फ्रूट यांना जास्त पसंती आहे. त्याचबरोबर चीजकेक, आइसक्रीम केकसुद्धा लोकांच्या खास पसंतीचे असल्याचे अनुश्रीने सांगितले.
ख्रिसमसच्या दिवशी प्लमकेक, वाइन केक, रम केक या पारंपरिक केकना अजूनही लोकांची पहिली पसंती असली, तरी इतर वेळी व्हेज केकची मागणी ग्राहक करू लागल्याचे माहीमच्या ‘व्हेज बेकरी’च्या विक्रत्याने सांगितले. मुख्यत्वे संध्याकाळी किंवा छोटे समारंभ, पार्टीला खाण्यास सोयीच्या अशा ‘व्हेज पेस्ट्रीज’ना जास्त मागणी असते, असे ते सांगतात. साधारणपणे या पेस्ट्रीजची किंमत ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत असते. तर व्हेज केक ३०० रुपयांपासून ते ८०० रुपये किलो या दराने बाजारात उपलब्ध आहेत.