शहरातील जुन्या हॉटेलांना अग्निप्रतिबंधक कायद्याच्या अमलबजावणीत सवलत देण्याची मागणी नाशिक रेसिडेन्सियल हॉटेल ओनर्स असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
शहरातील ९० टक्के हॉटेल ही १५ ते ३० वर्ष जुनी आहेत. त्यांना दरवर्षी अग्निप्रतिबंधक परवान्याचे नुतनीकरण करून देण्यात येते. ९० टक्के हॉटेलांमध्ये विंडो अथ़वा स्प्लीट वातानुकूलीत यंत्रणा आहे. मध्ये वातानुकूलीत (सेंट्रल एसी) असा प्रकार जुन्या हॉटेलांमध्ये अद्याप तरी नाही. बहुतेक हॉटेलांना (सेंट्रल एसी) नसल्यामुळे अग्निप्रतिबंधक ‘डिटेक्टर’ची जरुरी का, हे सजमत नसल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. जुन्या हॉटेलांना आता ही यंत्रणा बसविणे कसे शक्य आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
या हॉटेलांना ज्यावेळी परवाने देण्यात आले होते त्यावेळी त्यांनी तत्कालीन नियम, अटी, शर्तीची पूर्तता केली होती. उदा. वाळूच्या बादल्या, अग्निशामक सिलिंडर, खोल्या, लिफ्ट, मोकळ्या जागेत आगीच्या वेळी बाहेर पडण्याच्या मार्गाची माहिती लावण्यात आली आहे.
गच्चीवर टाकी, प्रत्येक मजल्यावरील गच्चीच्या टाकीतून तीन इंच पाइपची जोडणी, अशा सर्व नियमांचे पालन झालेले आहे. अग्निशामक विभागाकडून दरवर्षी पाहणी झाल्यानंतरच या हॉटेलांना परवान्याचे नुतनीकरण करून मिळते. काही हॉटेलांमध्ये विहीर आहेत. कुपनलिका आहेत. सर्व जुन्या हॉटेलांची उंची तीन ते चार मजल्यापर्यंतच आहे. बहुतांशी हॉटेल सर्व बाजूंनी मोकळी आहेत. बऱ्याच हॉटेलांना जिने आहेत.
जुनी सर्व हॉटेल लहान असून जास्तीत जास्त ४० खोल्या असे त्याचे स्वरुप आहे. या सर्व कारणांमुळे काही किरकोळ प्रकार वगळता नाशिकमधील कुठल्याही रेसिडेन्सियल हॉटेलला आग लागल्याचे व त्यामुळे जिवितहानी झाल्याचे उदाहरण नाही हे लक्षात घेण्यासारखे असल्याचे संघटनेने निवेदनात म्हम्टले आहे.