कुंभमेळा प्राधिकरण समिती स्थापण्याची मागणी
आगामी कुंभमेळा नीटनेटका व्हावा, प्रशासन आणि आखाडय़ांचे महंत यांच्यात कायमस्वरूपी सुसंवाद राहावा, साधुग्रामसाठी जागेचा प्रश्न त्वरित सोडवावा, कुंभमेळ्याचे नेटके नियोजन व्हावे यासाठी ‘कुंभमेळा प्राधिकरण समिती’ गठीत करावी. या मागण्या करतानाच प्रशासनाला सहकार्य राहील; मात्र धार्मिक कामांबद्दल तडजोड होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित बैठकीत साधु-महंतांनी मांडली.

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने साधु-महंतांशी चर्चा केली. नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने बैठक सुरू झाली. साधुग्रामसह अन्य काही विषयांवर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बैठकीत काय होईल याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी नियोजनाबद्दल माहिती दिली. कुंभमेळा ऐन पावसाळ्यात येत असल्याने प्रशासनासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र ती पेलण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने काही कायमस्वरूपी, तर काही तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभाग सिंहस्थासाठी किती निधी खर्च करणार याची माहिती त्यांनी दिली. शहर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तात्पुरत्या स्वरूपात काही पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनदरबारी निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच कुंभमेळ्याचे काम व्यवस्थित व्हावे, त्याची माहिती सर्वाना व्हावी यासाठी स्वतंत्र कुंभमेळा कक्ष तसेच संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. साधुग्राम जागा अधिग्रहणाबाबत शेतक ऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांनी आगामी कुंभमेळा कपिला आणि गोदा संगमावर म्हणजे तपोवन परिसरातच होईल, त्याचे धार्मिक महत्त्व अबाधित राहण्यासाठी तपोवनातील साधुग्रामच्या जागेचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, असे सूचित केले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंताची संख्या पाहता त्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, शाहीमार्ग एक महिन्यासाठी आरक्षित करावा, कुंभमेळ्याचे नियोजन नेटके व्हावे यासाठी स्वतंत्र प्राधिकरण गठीत करावे, त्या समितीत आखाडय़ाच्या काही महंतांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करावा, शेतक ऱ्यांची जमीन साधुग्रामसाठी आरक्षित करताना त्यांना वर्षांचे भाडे देण्यात यावे, कुंभमेळ्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा विनियोग कसा झाला याचा तपशील सादर करावा, आदी मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रशासनाच्या एकंदरीत कामकाजाबद्दल दिगंबर आखाडय़ाने आक्षेप घेतला. प्रशासन कामांची जंत्री सादर करत असले तरी ते काम प्रत्यक्ष कुठे सुरू आहे याची माहिती देण्यात यावी, साधुग्रामसाठी किमान ३५० एकर जागा असावी, साधु-महंतांसाठी स्वच्छतागृहे, मुबलक पाणी, निवारा याची व्यवस्था चांगली असावी, जमीन अधिग्रहणाचा तपशील द्यावा, शाही मार्गाची आखणी करताना तो सर्वाना सुलभ होईल याचा विचार व्हावा, गोदा प्रदूषण मुक्तीसाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी दिगंबर आखाडय़ाकडून करण्यात आली. कैलास मठाचे स्वामी सविदानंद सरस्वती यांनी मागील कुंभमेळ्यात ३०० एकर जागा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते; मात्र तेवढी जागा न मिळता, आहे त्या जागेवर पालिका किंवा अन्य लोकांचे अतिक्रमण होत असल्याकडे लक्ष वेधले. या परिसरात मद्यपानाला प्रतिबंध करावा, अशी मागणी त्यांनी केली. स्वामी नारायण मंदिर दिगंबर आखाडय़ाचे शास्त्रीजी यांनी कुंभमेळ्याच्या कामात प्रशासन संथपणे काम करत असल्याचे टीकास्त्र सोडले. या स्थितीत आगामी कुंभमेळा कसा होणार, असा प्रश्न त्यांनी केला.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीस प्रारंभी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. पण या बैठकीत उद्योजक धनंजय बेळे यांना मुक्त प्रवेश दिला गेला. साधु-महंतांच्या बैठकीत बेळेचे काय काम, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

प्रशासन सरबराईत दंग
आगामी कुंभमेळ्यात साधु-महंत आणि प्रशासन यांच्यात कटुता येणार नाही याची बरीच दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली. त्याचे प्रत्यंतर या बैठकीच्या निमित्ताने आले. सकाळी दहा वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी कामाला लागले होते. साधु-महंतांच्या सरबराईत कोणती कमतरता राहू नये यासाठी बैठकीस आलेल्या महंतांचे नामफलक, बैठकीत चर्चेसाठी ठेवलेल्या विषयांची यादी ठेवण्यात आली होती. बैठकीस आलेल्या १२ हून अधिक आखाडय़ांच्या पदाधिकाऱ्यांसह महंतांचे पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. साधु-महंतांच्या सरबराईत कोणतीही तोशीस राहू नये याची दक्षता प्रशासनाने घेतली होती.